Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 31 May 2010

सीबीआय की खास अधिकारी?

ड्रग प्रकरणी आज निर्णय शक्य
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी) - पोलिस ड्रग पॅडलर प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावे की राज्य पोलिस खात्यातीलच विशेष अधिकारी नेमावा, यावर उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. सदर प्रकरण "सीबीआय'कडे किंवा अन्य कोणत्याही स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवल्यास कटू सत्य बाहेर येण्याची भिती काहींना सतावत असल्याने याचे तपासकाम "सीबीआय'कडे जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. तसेच गृहमंत्रीही याचा तपास राज्य पोलिसांमार्फतच लावला जावा, यावर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सध्या या प्रकरणात एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई निलंबित झाले आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही पोलिस अधिकारी गुंतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच गोवा पोलिस खात्यातीलच अधिकारी संशयाच्या घेऱ्यात सापडले असताना त्याचा त्याच पोलिसांमार्फत तपास केला जात असल्याने न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
गेल्यावेळी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यास अनुत्सूकता दाखवली होती. तसेच, सध्या असलेला तपास अधिकारी बदलून अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या प्रकरणाचे तपास काम सोपवण्यास तयार असल्याचे म्हटले होते. यावेळी न्यायालयाने ठोस काय तो निर्णय येत्या २ जून पर्यंत कळवण्याची सूचना सरकारला केली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा उद्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

No comments: