बडे राजकारणी व प्रतिष्ठितांचाही हात
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्यातील आंबेली व गोमळ- वेळगे येथील दोन बेकायदा खाणींची प्रकरणे उजेडात आल्यानंतर आता सत्तरीतील पणशे व सावर्डे गावांतूनही अनेक ट्रकांमधून एका "बड्या' मंत्र्यांच्या आश्रयाखाली खनिज मालाची तस्करी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गावातील आजी - माजी स्थानिक राजकारणी, प्रशासनातील व प्रसिद्धिमाध्यमातील व्यक्ती तसेच प्रतिष्ठित लोकांचाही हात
असल्याची माहिती उघडकीस आली असून यामुळे सत्तरी भागात मोठी खळबळ माजली आहे.
गोमळ - वेळगे येथे खनिज उत्खनन करण्यासाठी स्थानिक राजकारण्याने व एका शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीने वेळगेतील एका कुटुंबाला ४ लाख रुपये देऊन पॉवर ऑफ ऍटर्नी मिळवून तेथून खनिज मालाची तस्करी केल्याचे वृत्त "गोवादूत' ने उघडकीस आणले होते. परंतु, आता नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, या खनिज मालाच्या तस्करीसाठी तब्बल ८० लाखांचा व्यवहार झाला होता. यात वेळगेतील "त्या' गरीब कुटुंबाला फक्त ४ लाख रुपये देऊन कटवण्यात आले व उर्वरित ७६ लाख वरील दोन व्यक्तींनी आपसात वाटून घेतले, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, या फसवणूकप्रकरणी त्या कुटुंबातील एका वारसाने या प्रकरणात गुंतलेल्या विद्यमान सरकारमधील एका बलाढ्य मंत्र्याला चंागलेच फैलावर घेतल्याची माहितीही मिळाली आहे. पॉवर ऑफ ऍटर्नीच्या व्यवहारासाठी लागलेले सर्व पैसे "त्या' मंत्र्याने मोजले होते.
दरम्यान, हा व्यवहार झाल्यानंतर सदर दोन्ही व्यक्तींची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारली असल्याचे व त्यातील एकाने एक कार, दोन ट्रक, एक नवीन घर व एका शैक्षणिक विद्यालयाकरिता इमारत एवढा प्रपंच उभारल्याने अनेकांच्या भुवया विस्फारल्या गेल्या आहेत. या प्रकरणात प्रशासनातील एकाने व अन्य एका राजकारण्याने प्रत्येकी ५ लाख रुपये घेऊन आपले उखळ पांढरे करून घेतल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, सावर्डे- सत्तरीतून काही दिवसांपूर्वी तीन ट्रकांमधून तर पणशे - सत्तरीतून अनेक ट्रकांतून बेकायदा पद्धतीने खनिज मालाची तस्करी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सावर्डे तस्करी प्रकरणात एका आमदाराचा हात असल्याचे बोलले जाते आहे. आंबेली, गोमळ-सावर्डे, पणशे येथून जो माल उचलण्यात आला तो आधी पाळीला पाठविण्यात आला व तेथे त्याचा साठा करून नंतर पाळीतील काही ट्रकांमधून या मालाची राजकीय वरदहस्ताने तस्करी केली गेली आहे. या व्यवसायात एका मंत्र्याने आपले लक्ष केंद्रित केल्याने सत्तरीत सध्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सामील असलेल्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीची पॉवर ऑफ ऍटर्नी प्रकरणी सखोल चौकशी करावी व सरकारी सेवेतून तिला तात्काळ निलंबित करावे, यासाठी सत्तरीतील काही जागरूक नागरिक शिक्षण खात्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते.
Saturday, 3 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment