Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 28 March 2010

प्रज्ञा मोरजकर मृत्यू प्रकरण डॉक्टर, अधीक्षकांवर कडक कारवाई होणार

आरोग्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन
पणजी, दि. २७ (विशेष प्रतिनिधी): डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रज्ञा मोरजकर यांच्या अकाली निधनाबद्दल खेद प्रकट करताना, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील संबंधित डॉक्टर तसेच वैद्यकीय अधीक्षक अशा दोघांवरही कारवाई करण्याचे आश्वासन आज विधानसभेत दिले.
जे झाले ते अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे.अशा निष्काळजीपणाला माफी नाही, असे ते म्हणाले. प्रथमदर्शनी चौकशीत ड्युटीवर संबंधित डॉक्टर हजर नसल्याचे दिसून आले आहे. अशा प्रसंगी डॉक्टर इस्पितळात उपलब्ध असणे ही वैद्यकीय अधीक्षकांची जबाबदारी असते, असे त्यांनी नमूद केले. डॉक्टरांनी अत्यंत संवेदनशील असले पाहिजे; तथापि, अनेक सरकारी डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करतात किंवा अन्य गोष्टींत गुंतून आपल्या वैद्यकीय जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात, असेही ते म्हणाले.
बाळंतपणानंतर अतिरक्तस्रावाने प्रज्ञाचे निधन झाले व त्यावेळी तिच्यापाशी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने योग्य ती वैद्यकीय मदत तिला मिळू शकली नाही हे सांगताना आरोग्यमंत्री म्हणाले की आता डॉक्टरांवरच नव्हे तर वरिष्ठांवरसुद्धा कारवाई करण्याची वेळ आली आहे.

No comments: