पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांचे निलंबन हा न्यायप्रविष्ट विषय आहे हे खरे असले तरी त्यांच्या निलंबनाची कारणे पाहता न्यायप्रक्रियेतही राजकारणाचा शिरकाव झाल्याचा संशय बळावतो,अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी हा विषय उपस्थित केला. न्यायप्रक्रियेबाबत किंवा न्यायालयाच्या निवाड्याबाबत मतप्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही, हे खरे आहे. तथापि, श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनाची जी कारणे देण्यात आली आहेत, त्यावरून त्यांना कसे काय निलंबित करण्यात आले, असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे पर्रीकर म्हणाले.
अपघात प्रकरणी त्यांनी दिलेल्या निवाड्याच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम विमा कंपनीकडून जमा करण्यात आली, असा ठपका त्यांच्यावरील आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे. आता नुकसान भरपाईपेक्षा जास्त रक्कम विमा कंपनी जमा करणारच का, असा विषय तर उपस्थित होतोच; त्याचबरोबर ही रक्कम व्याजासह जमा करण्यात आली असावी,असाही होतो. विमा कंपनीकडून ही अतिरिक्त रक्कम जमा करण्याचे कारण शोधून काढण्यापूर्वी थेट न्यायाधीशांवरच ठपका ठेवला जाणे हे दुर्दैवी असल्याचे पर्रीकर म्हणाले.
राजकारणापासून कोणतेच क्षेत्र अलिप्त राहीलेले नाही. लोकशाहीचे स्तंभदेखील अशा पद्धतीने गंजत चालले आहेत ही गोष्ट चांगली नाही,असे पर्रीकर म्हणाले.
Sunday, 28 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment