Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 29 March 2010

बेकायदा मद्यार्कप्रकरणी महत्त्वाची कागदपत्रे काश्मीर गुन्हा विभागाकडे

पणजी, दि.२८ (प्रतिनिधी) - गोव्यातील बेकायदा मद्यार्क आयात प्रकरणाचे धागेदोरे थेट काश्मीरपर्यंत असल्याचे उघडकीस आले आहे. या अनुषंगाने काश्मीर गुन्हा विभागाचे पथक गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दाखल झाले असून त्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. अबकारी खात्याकडून काश्मिरात झालेल्या व्यवहारांचा तपास सुरू आहे व त्यासंबंधी नेमके मतप्रदर्शन करणे या घटकेला योग्य ठरणार नाही, अशी माहिती चौकशी करणाऱ्या काश्मीर सरकारच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अबकारी खात्यातील सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांच्या मद्यार्क आयात घोटाळ्याचा सभागृहात पर्दाफाश करूनही मुख्यमंत्री दिगंबर कामत मात्र या घोटाळ्याची गांभीर्याने चौकशी करण्यास उत्सुक नाहीत. या घोटाळ्याची व्याप्ती आंतरराज्य पातळीवर आहे व गुन्हेगारी पातळीवर त्याची चौकशी होण्याची गरज आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांकडून मात्र वित्त सचिवामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पर्रीकरांनी यासंबंधीची कागदपत्रे उघड करूनही आता एक महिना उलटला तरी वित्त सचिवांना अद्याप या घोटाळ्यात प्राथमिक पुरावेच सापडत नसल्याने हे चौकशीचे वारूळ निव्वळ धूळफेक असल्याची टिकाही आता विरोधक करीत आहेत.घोटाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी महसूल बुडाला याची चिंता करण्याचे सोडून अबकारी खात्याच्या वाढत्या महसुलाचा आलेख देऊन मुख्यमंत्री या प्रकरणातील संशयितांना पाठीशी घालीत आहेत,असाही आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. सभापती प्रतापसिंग राणे यांनीही या घोटाळ्यासंबंधी चिंता व्यक्त करून ही गंभीर बाब असल्याचे मतप्रदर्शन सभागृहात केले.
दरम्यान, या घोटाळ्यातील काळा पैसा हा ईशान्य राज्ये तथा सीमाभागातील राज्यांत जातो व त्यातील काही भाग हा दहशतवादी कारवायांसाठीही वापरला जाण्याचा संशय पर्रीकरांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर काश्मीर सरकारचे गुन्हा विभागाचे अधिकारी अबकारी घोटाळ्यासंबंधीच गोव्यात दाखल झाल्याने या संपूर्ण व्यवहारांचे गांभीर्य वाढले आहे. ही चौकशी सुरू असल्याने त्याबाबत कोणतीही माहिती पुरवणे सध्या शक्य नाही पण काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून ती तपासण्याचे काम सुरू आहे,अशी माहिती चौकशी अधिकाऱ्याने "गोवादूत' कडे बोलताना दिली.

No comments: