महालेखापालांनी केला पर्दाफाश
वर्ष उलटले तरी चौकशी ठप्प
पणजी,दि.२८ (प्रतिनिधी) - फोंडा नगरपालिकेत गेल्या २००६- ०८ या काळातील लेखा अहवालाचा तपास केला असता पालिकेकडे जमा करण्यात आलेली सुमारे ४०.७७ लाख रुपयांची रक्कम बॅंक खात्यात जमा झाली नसल्याचे उघड झाले आहे. परवा राज्य विधानसभेत सादर करण्यात आलेल्या महालेखापालांच्या अहवालात नगर विकास खात्याच्या लेखा परीक्षणात हा अपहार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी महालेखापालांनी आपल्या परीक्षणात केलेल्या टिप्पणीत फोंडा पालिकेतील या व्यवहाराबाबत संशय व्यक्त केला आहे. गोवा दमण व दीव पालिका लेखा संहितेनुसार पालिका मंडळाकडे महसुलाच्या रूपाने जमा होणाऱ्या पैशांची नोंद रोख नोंद वहीत करून ती वेळोवेळी बॅंक खात्यात जमा करावी लागते. प्रत्येक दिवशी रोख व्यवहारांची नोंद रोख नोंद वहीत ठेवावी लागते व दिवसाच्या अखेरीस या नोंदवहीवर मुख्य अधिकाऱ्यांनी सही करावी लागते.प्रत्येक महिन्याच्या अखेरीस रोख नोंदवहीतील हिशेब हा बॅंक खात्यात जमा होणाऱ्या रकमेशी जुळवावा लागतो. त्यात तफावत आढळल्यास त्याची कारणे व त्यात केलेल्या दुरुस्तीची नोंद सदर रोख नोंदवहीवर करणे बंधनकारक असते. दरम्यान, फोंडा पालिकेच्या जानेवारी व फेब्रुवारी २००९ महिन्याच्या लेखा परीक्षणावेळी गेल्या २००६-०८ या काळातील सुमारे ४०.७७ लाख रुपयांची पालिकेकडे जमा झालेली रक्कम बॅंक खात्यात जमा झाली नसल्याचे आढळून आले आहे.
दरम्यान, पालिकेच्या सप्टेंबर २००८ च्या अंतर्गत लेखा अहवालात हिशेबातील त्रृटींबाबत टिप्पणी करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या रोख व्यवहाराची नोंद रोख नोंद वहीत करण्याची व मुख्य सचिवांनी किंवा अन्य कुणा अधिकाऱ्यांनी ती तपासून आपली सही करण्याची पद्धत अवलंबिण्यात येत नसल्याचे म्हटले आहे. पालिकेत जमा होणारी रक्कम व नंतर बॅंक खात्यात जमा होणारी रक्कम यांची सांगड घालण्याचीही तसदी त्या काळात कुणी घेत नव्हता,असेही आढळून आले आहे. पण विशेष म्हणजे हिशेबातील या अपहाराची नोंद मात्र या अंतर्गत लेखा अहवालात करण्यात आली नसल्याने हा प्रकार उघडकीस आला नाही,असा ठपका महालेखापालांनी ठेवून अंतर्गत लेखा परीक्षणाच्या बेफिकीरीवरही बोट ठेवले आहे. गेल्या फेब्रुवारी २००९ महिन्यात या अपहाराबाबत खुद्द मुख्य अधिकाऱ्यांनी संमती दर्शवली आहे. यासंबंधी नगर विकास खात्याला माहिती देण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या जुलै २००९ महिन्यात या चौकशीबाबत सरकारला विचारले असता या अपहाराचा तपास सुरू आहे,असाच खुलासा करण्यात आल्याचेही महालेखापालांनी म्हटले आहे. या प्रकरणाला आता एक वर्ष पूर्ण होऊनही या चौकशीतून अद्याप काहीच निष्पन्न होत नसल्याने हे ४०.७७ लाख रुपये गेले कुठे,असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Monday, 29 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment