Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 28 March 2010

रस्ते की कत्तलखाने?

हळदोण्याचे आमदार ऍड.दयानंद नार्वेकर यांनी आज रस्ता अपघातांच्या एका प्रश्नावरून वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना कात्रीत पकडलेच; पण त्याही पलीकडे त्यांनी एका गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात होणाऱ्या रस्ता अपघातांची संख्या पाहिली की हे रस्ते की कत्तलखाने आहेत,असा सवाल नार्वेकरांनी केला. एकूण अपघातांची संख्या पाहिल्यास दहा टक्केदेखील अपघात प्रकरणे नोंद होत नाहीत याचा अर्थ काय? नार्वेकर संतापले. न्यायालयाने किंवा पोलिसांनी वाहन चालकाविरोधात निष्क्रियतेचा ठपका ठेवूनही एकाही चालकाचा परवाना रद्द होत नाही, नार्वेकरांचा पारा चढलेला. वाहतूक मंत्री कात्रीत सापडलेले; अपघात प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम पोलिसांचे, ढवळीकरांनी चेंडू रवींवर ढकलला. आंबेली येथे तर चक्क "एनएस' असे लिहून ट्रक हाकले जातात, याचा अर्थ "नॉन स्टॉपेबल' कुणी दिला हा परवाना, कारवाई का होत नाही. "सभापती महाशय इथे कारवाई करायला गेल्यास वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांना घेरतात व त्यांच्या हातातील नोंद वही व इतर सामग्री काढून घेतात.ढवळीकरांच्या उत्तराने नार्वेकर खवळले. याचा अर्थ या राज्यात सरकार नाहीच. मनोहर पर्रीकरांनीही चीड व्यक्त केली. हा प्रकार म्हणजे एकतर मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा या सरकारने तरी घरी बसावे, पर्रीकरांचा निवाडा.
बाबू आजगावकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे व्दंद्व हा नेहमीच सभागृहातील मनोरंजनाचा भाग. काल पार्सेकर यांनी पुन्हा क्रीडानगरीच्या विषयावरून बाबूंना डिवचले. सभागृहात उत्तर देताना एखाद्या प्रचारसभेत बोलण्याचा आव आणत असलेले बाबू नेमके आक्रस्ताळेपणा करतात व सभापतींच्या रोषालाही कारणीभूत ठरतात. आज तोच प्रकार घडला. परवा चर्चिल यांनी असाच एक शब्द वापरला, त्याच प्रकारे काल बाबूंचीही अशीच चढाओढ सुरू होती. आपल्या उत्तरावर प्रतिप्रश्न करीत रहा,असे त्यांना सांगायचे होते व त्यामुळे त्यांनी खास गोमंतकीय शैलीत आपल्यावर ** राहा. पार्सेकरांनी या शब्दाचा अर्थ अचूक हेरला व सभापतींनीही ते ओळखले. रस्त्यावरची भाषा वापरू नका, सभागृहात सभ्य भाषा वापरा, सभापतींची तंबी. या वादाला पर्रीकरांनीही फोडणी घातली. सभापती महोदय, हे मंत्री आपल्याला नेहमी मुख्य मुद्यापासून दूर नेतात. आपल्याला बोलण्याची संधी द्या, अन्यथा यांच्याच बातम्या वर्तमानपत्रात झळकतात व तेच हिरो बनतात. बाबूंचा तावातावाने दावा. बाबू ऐकायला तयारच नाही, खाशांनी खडसावले व शेवटी मार्शलकरवी बाहेर काढावे लागेल,अशीही तंबी दिली. पार्सेकरांनी गेल्या अधिवेशनातील बाबूंचे राजीनामा देण्याचे भाषण सुनावले. बाबूंच्या वरमावरच घाव, त्यांनीही पार्सेकरांच्या भाषणाची प्रत आणलेली. शेवटी बाबूंनी झाडांची संख्या सांगितलेली ती कवाथे अशी नोंद त्यांच्या भाषणांत असल्याचे त्यांनी सांगितले व या आपल्याच राजीनाम्याच्या आव्हानातून आपली सुटका करून घेतली.
रमेश तवडकर यांनी दूध व्यवसायाबाबत विचारलेल्या व गेल्यावेळी पुढे ढकललेल्या प्रश्नाचे उत्तर पशुसंवर्धनमंत्री रवी नाईक यांनी दिले, पण केवळ दोन पानी. गेल्यावेळी या प्रश्नाचे उत्तर मोठे असल्याने तो पुढे ढकललेला. आता त्याचे उत्तर केवळ दोन पानेच. दूध व्यवसायातील अनेकांकडून सरकारला महसूल येणे आहे, त्याची बेरीज कशी केली. रवी काही प्रमाणात गोंधळले. पर्रीकरांनी मात्र या बेपर्वाईची दखल घेत उत्तरे देण्यात सरकारकडून होत असलेल्या बेफिकीरीबाबत सभापतींकडे नाराजी व्यक्त केली. खाशांनीही आवाज चढवला. सभागृहाला गृहीत धरण्याची कृती अजिबात सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आपले मंत्री व अधिकाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे नीट देण्यास बजवावे,अशी तंबी सभापतींनी दिली. बाकी या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारची खरडपट्टी काढलीच; पण वेळोवळी सभापतींनीही सरकारला शिस्त पाळण्याबद्दल चार खडे बोल सुनावण्याची संधी सोडली नाही. ही शिस्त निदान पुढील अधिवेशनात तरी पाहायला मिळेल एवढीच (माफक) अपेक्षा.

No comments: