नेतृत्वबदलाच्या मागणीवर 'जी-७' ठाम
अंतिम निर्णय सोनिया गांधींच्या हाती
गटात फूट पाडण्यासाठी कॉंग्रेसचा आटापिटा
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): कॉंग्रेस आघाडी सरकारातील "ग्रुप ऑफ सेव्हन' अर्थात कॉंग्रेसेतर "जी - ७' गटाने आज नेतृत्वबदलाच्या आपल्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेत दिल्लीत झालेल्या बैठकीत कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण केला आहे. "जी - ७' गटाच्या या पवित्र्यासमोर कॉंग्रेस नेते हतबल झाले असून या मागण्यांबाबतचा अंतिम निर्णय श्रीमती सोनिया गांधीच घेतील, असे निमित्त पुढे करून त्यांनी निदान आजपुरता तरी या चर्चेला आवर घातला. मात्र या राजकीय गुंत्यावर तोडगा काढण्यासाठी उद्याही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच राहणार असून कामगिरी फत्ते केल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा निर्धारच या गटाने व्यक्त केला आहे.
कॉंग्रेस आघाडी सरकारातील कॉंग्रेसेतर नेत्यांनी आपला लढा अधिक तीव्र करताना आज दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींना चांगलेच कैचीत पकडले. या नेत्यांनी आपली कैफियत त्यांचे तथा राष्ट्रवादीचे नेते, केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर मांडली. सरकार स्थापनेपासून आत्तापर्यंत राज्यात प्रदेश राष्ट्रवादीला योग्य तो न्याय मिळाला नाही, अशी तक्रार महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी केली. आघाडीचा धर्म विसरून काही कॉंग्रेस नेते राष्ट्रवादी नेत्यांच्या मतदारसंघांत नाक खुपसण्याचे काम करतात, त्यांना वेळीच आवरायला हवे, असे पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी स्पष्ट केले. दिगंबर कामत यांचे नेतृत्व कमी पडत असल्याने व आपल्या मंत्र्यांवर काबू मिळवण्यात त्यांना अपयश येत असल्याने नेतृत्वबदल व्हायलाच हवा, असेही यावेळी या नेत्यांनी वरिष्ठांना पटवून दिल्याची खबर आहे. मुख्यमंत्री हा कॉंग्रेसचाच असेल व त्यासाठी विद्यमान सभापती प्रतापसिंग राणे यांच्या नावाला या नेत्यांनी पसंती दर्शवल्याचीही अंतर्गत गोटाची खबर आहे. काही महत्त्वाची खाती या गटाला मिळायला हवी, असा प्रस्ताव ठेवतानाच चर्चिल यांच्याकडे असलेले सार्वजनिक बांधकाम खाते, आलेक्स सिकेरा यांचे वीज खाते व रवी नाईक यांचे गृहखाते काढून घेतले जावे अशीही जोरदार मागणी या गटाने केल्याचे समजते.
दरम्यान, या गटाचा हा प्रस्ताव घेऊन श्री. पटेल यांनी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, तथा कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांच्याशी त्यांची दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत श्री. पटेल यांनी "जी - ७' गटाच्या मागण्या कॉंग्रेस नेत्यांसमोर ठेवल्या. या मागण्यांबाबत राजी होण्यास कॉंग्रेस नेत्यांनी सुरुवातीस नकार दिला. या मागण्या अव्यवहार्य असल्याचे सांगून त्यांनी याबाबत श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय कळवू,असे सांगितले. श्रीमती सोनिया गांधी या सध्या दिल्लीबाहेर असून त्या या दोन दिवसांत परततील. त्यामुळे हातात असलेल्या या दोन दिवसांचा सदुपयोग करत "जी - ७' गटातच फूट घालण्याचे जोरदार प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरू असल्याचेही कळते. दरम्यान, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी काही पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचे मान्य करून या गटाने ठेवलेल्या मागण्यांबाबत कॉंग्रेस श्रेष्ठींशी विचारविनिमय करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
Thursday, 1 April 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment