ताईंच्या उल्लेखाने सारेच स्तंभित
मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी) : येथील "वूडलॅंडस्' हॉटेलमध्ये काल रविवारी आयोजित महिला आरक्षण विधेयकावरील एका परिसंवादात बोलताना माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर यांनी व्यासपीठावर असलेले विरोधी पक्षनेते
मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख "विरोधी पक्षनेते आणि भावी मुख्यमंत्री' असा केला अन् तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या..
गोव्यातील सध्याची अस्वस्थ राजकीय परिस्थिती, सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी आघाडीतच सुरू असलेली सुंदोपसुंदी, विविध गोटांतून प्रसृत होणारी परस्परविरोधी वक्तव्ये व या पार्श्वभूमीवर राज्याची वाटचाल मुदतपूर्व निवडणुकांच्या दिशेने होत असल्याबाबत मिळणारे संकेतांमुळे ताईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पर्रीकरांबाबत केलेला उल्लेख सर्वांनी विशेष गांभीर्याने घेतला.
"गोवा पब्लिक कॉज फाऊंडेशन'ने "महिला आरक्षण विधेयक' या विषयावर आयोजित केलेल्या या परिसंवादाचे उद्घाटन श्रीमती काकोडकर यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर दोघे कर्तबगार व प्रशासनावर आपला ठसा उमटवणारे माजी मुख्यमंत्री आल्याचे पाहून गोव्यातील विद्यमान राजकीय व्यवस्थेत परिवर्तन घडवणे त्यांनाच शक्य आहे, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये सुरू होती. ताईंनी पर्रीकरांबाबत केलेल्या उल्लेखामुळे त्यास नकळत पुष्टी मिळाल्यासारखेच झाले!
Tuesday, 30 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment