Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 31 March 2010

न्यायालयाच्या 'मालखान्या'ला भगदाड!

पकडलेल्या २८० किलो चरसपैकी
५ किलोपेक्षाही कमी माल शिल्लक


सर्व सीलबंद अमली पदार्थाची तपासणी होणार
अनेक निरीक्षकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा
प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांचा एक गट सक्रिय

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेला व न्यायालयाच्या "मालखान्या'त असलेला अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात गायब झाला असल्याचे उघडकीस आले असून जप्त करण्यात आलेल्या २८० किलो चरसपैकी पाच किलोपेक्षाही कमी "माल' हाती लागला आहे. या प्रकारामुळे वरिष्ठ पोलिस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. हा अमली पदार्थ कुठे व कसा गायब झाला याबद्दल सध्या गरमागरम चर्चा सुरू झाली आहे.
दोन दिवसांपासून या "मालखान्या'तील अमली पदार्थाची तपासणी करण्याचे काम गुन्हा अन्वेषण विभागाने हाती घेतले आहे. हे काम आजही सायंकाळपर्यंत सुरूच होते. "हे केवळ एक उदाहरण असून अशाप्रकारे अनेक किलोंचा अमली पदार्थ "मालखान्या'तून गायब झाला असून त्यातील निम्मा भागच तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागतो आहे. त्यामुळे शिल्लक राहिलेला अमली पदार्थ हा अस्सल आहे की बनावट, हे तपासून खातरजमा करून घेण्यासाठी सर्व अमली पदार्थाची पाकिटे सीलबंद करून प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आहे', असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
१९८८ ते २०१० या दरम्यान विविध पोलिस स्थानकांत आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेला अमली पदार्थ या "मालखान्या'त ठेवला जात होता. आता तब्बल २२ वर्षानंतर या सर्वांच्या नोंदी तपासून पाहिल्या जात आहेत. या "मालखान्या'ला सुरक्षा देण्याची जबाबदारी ही अमली पदार्थ विरोधी पथकाची होती. दरम्यानच्या काळात अनेक पोलिस निरीक्षक या ठिकाणी सेवा बजावून गेले असून त्यांनाही आता या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात पोलिसांचाच एक गट सक्रिय झाला असल्याचीही माहिती मिळाली आहे. या ठिकाणी सेवा बजावून गेलेल्या निरीक्षकांपैकी काहीजण आज वरिष्ठ अधिकारीही झालेले असून या प्रकरणामुळे त्यांच्याही काळजात धडकी भरली आहे.
१९८८मध्ये एका कारवाईत २८० किलो अमली पदार्थ पकडण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पकडण्यात आलेला अमली पदार्थ न्यायालयात जमा करण्यात आला होता. या आरोपपत्रावर २००५साली निकाल लागल्यानंतर तो अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी परत करण्यात आला. जो पोलिस अधिकारी हा अमली पदार्थ घेऊन परत आला त्याने २८० किलो चरसपैकी पाच किलोपेक्षाही कमी अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यासाठी जमा केला असल्याची नोंद गुन्हा अन्वेषण विभागाच्या हाती लागली आहे.
त्याचप्रमाणे, म्हापसा येथील "एनडीपीएस' न्यायालयाच्या "मालखान्या'तही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असून तोही तपासून पाहिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे "अटाला' याने आपल्याला "मालखान्या'तून अमली पदार्थ मिळत असल्याच्या "यू ट्यूब'वर केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली असून पोलिस यंत्रणा कशी भ्रष्टाचारी झाली आहे याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणून समोर येते आहे. दरम्यान, न्यायालयातून विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अमली पदार्थाची नोंद ठेवली जात नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

No comments: