Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 3 April 2010

'त्या' फॅक्स मशीनचा गैरवापर कुणी केला?

अबकारी खाते मद्यार्क घोटाळा
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): आंतरराज्य मद्य घोटाळ्यासंदर्भात जम्मू काश्मीर पोलिसांच्या पथकाकडून सुरू झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी आता बचावात्मक पवित्रा स्वीकारत आपल्या कार्यालयातील "फॅक्स मशीन' व "लेटरहेड'चा कुणीतरी गैरवापर केल्याची पोलिस तक्रार नोंदवली आहे. तथापि, अबकारी खात्यातील "फॅक्स मशीन' हे खुद्द अबकारी आयुक्तांच्या केबिनमध्येच आहे. कार्यालयाच्या "लेटरहेड' चा वापर कुणी अज्ञाताने केला, असे जरी तूर्तास मान्य केले, तरी आयुक्तांच्या केबिनमधून कुणी अज्ञात व्यक्ती "फॅक्स' पाठवू शकते, यावर विश्वास ठेवणेच कठीण आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अबकारी खात्यातीलच कुणीतरी या कटात सामील असावा, अशी दाट शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या गुन्हा विभाग पोलिसांकडून मद्यार्क घोटाळा प्रकरणी राज्यातील विविध ठिकाणच्या अबकारी निरीक्षकांची जबानी नोंदवण्यात आल्याने त्यांच्यात सध्या विलक्षण भीतीचे वातावरण पसरले आहे. अबकारी खात्यात कोट्यवधी रुपयांचा मद्यार्क आयात घोटाळा झाल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कागदोपत्री पुराव्यांसहित उघड केले होते व त्यात आता जम्मू काश्मीर घोटाळ्याची भर पडल्याने या खात्याने आपली विश्वासार्हताच गमावलेली आहे. पर्रीकरांनी याप्रकरणी गंभीर आरोप करूनही "सीबीआय' चौकशीची मागणी मान्य करण्यास मुख्यमंत्री दिगंबर कामत तयार होत नसल्याने ते नक्की कुणाच्या कारवायांवर पांघरूण घालू पाहत आहेत, याचे कोडे अनेकांना पडून राहिले आहे. अबकारी आयुक्तांना अंधारात ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात "भानगडी' करण्याचे धाडस एखादा अधिकारी करू शकतो काय, असाही खडा सवाल उपस्थित होत असल्याने यामागे एखादे "रॅकेट'च कार्यरत असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता त्यांनी या तक्रारी संदर्भात चौकशी सुरू असल्याची जुजबी माहिती दिली. याबाबत आयुक्तांकडून काही माहिती मागवली आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अबकारी आयुक्तांनी दाखल केलेल्या तक्रारीबाबत पर्रीकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, आपण विरोधी पक्षनेता या नात्याने विधानसभा सभागृहात कागदोपत्री पुराव्यांसहित विविध राज्यांतून गोव्यात मद्यार्क निर्यात केल्याची माहिती दिली व या निर्यात परवान्यांना अबकारी खात्याकडून फॅक्सव्दारे मान्यताही दिल्याचे उघड केले आहे. असे असतानाही अबकारी कार्यालयातील फॅक्सचा गैरवापर झाल्याची तक्रार नोंद केली गेली नाही आणि आता जम्मू काश्मीर पोलिसांची चौकशी सुरू झाली असताना अचानक फॅक्सच्या गैरवापराची तक्रार नोंद होते, याचा अर्थ काय, असा सवालही पर्रीकर यांनी उपस्थित केला. जम्मू काश्मीरला अबकारी खात्याकडून परवान्याची मान्यता मिळाल्याचा फॅक्स जर खोटा तर आपण सांगितलेल्या प्रकरणातील परवान्यांची मान्यता खरी समजावी काय, असाही सवाल पर्रीकरांनी आता केला आहे.

No comments: