मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी): सीरियल किलर महानंद नाईककडून मारली गेल्याचा संशय असलेल्या रिवण येथील निर्मला अमोलकर खून प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी आज महानंदला दोषमुक्त केले. अशाच स्वरूपाच्या दोन प्रकरणांत त्याला यापूर्वीच दोषमुक्त करण्यात आले आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, निर्मला १९ फेब्रुवारी २००८ रोजी घरातून बाहेर पडली आणि घरी परतली नव्हती. तब्बल सहा दिवसांनी म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी तिचा मृतदेह वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळील पठारावर सापडला होता. ती घरातून निघाली तेव्हा तिच्या अंगावर सुमारे २० हजारांचे दागिने होते. नंतर हे दागिने तिच्या अंगावर नव्हते, असे दिसून आले होते. दरम्यानच्या काळात महानंदची प्रकरणे उघडकीस आल्यावर निर्मलाच्या भावाने या प्रकरणी तक्रार नोंदवली. महानंदवर संशय घेतल्यानंतर केपे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३०२ व ३९२ कलमाखाली गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल केले होते. मात्र आरोपीविरुद्ध पोलिस कोणताही ठोस पुरावा सादर करू शकले नाहीत. यापूर्वीच्या दोन्ही प्रकरणांत सरकार पक्षावर अशीच नामुष्की ओढवली होती. एकूण सोळा खून प्रकरणांत महानंद हा आरोपी असून आता बाकीच्या प्रकरणांत कोणता निकाल लागतो, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
Wednesday, 31 March 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment