Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 30 March 2010

अफरातफर प्रकरणी फोंडा पालिका उदासीन

गुंतलेल्यांना वाचवणासाठीच वेळकाढूपणा? चौकशीची मागणी

फोंडा, दि. २९ (प्रतिनिधी) - पालिकेत झालेल्या लाखो रुपयांच्या अफरातफर प्रकरणी पालिका प्रशासन संवेदनशील नाही. त्यामुळे ह्या ४० लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ह्या प्रकरणात गुंतलेल्यांना वाचविण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात वेळकाढूपणा केला जात आहे, अशी चर्चा लोकांत सुरू झाली आहे. ह्या अफरातफर प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे. यापूर्वीच्या काळातही पालिकेत अफरातफर झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केवळ याच काळातील नाही तर त्यापूर्वीच्या काळातील व्यवहारांचेही लेखा परीक्षण पुन्हा करून घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.
येथील फोंडा नगरपालिकेत प्रशासकाच्या राजवटीत २००६-०७ आणि २००७ -०८ या वर्षात झालेल्या ४०.७७ लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव फोंडा पालिका मंडळाने गेल्या १६ एप्रिल २००९ रोजी संमत केलेला असली तरी अद्याप या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही.
पालिकेत प्रशासकाच्या राजवटीत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर फोंडा पालिका मंडळाने एका तातडीची बैठक घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव संमत केला होता. हा ठराव गेले अकरा महिने धूळ खात पडून आहे. फोंडा पालिकेतील या अफरातफर प्रकरणाचा यापुढे तपास केला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी जयंत तारी यांनी या प्रतिनिधीला सोमवारी (दि. २९) दिली आहे. पालिका मंडळाने या अफरातफर प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव संमत केलेला असला तरी आजपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आलेली नाही. आगामी काळात या चौकशीसंबंधी कार्यवाही केली जाणार आहे. पालिकेत अफरातफर झालेल्या काळातील फेरपरीक्षण तसेच त्यापूर्वीच्या काळातील परीक्षण केले जाणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, गेले काही महिने गाडले गेलेले हे अफरातफर प्रकरणाचे भूत पुन्हा वर आले असून फोंडा पालिका कार्यालयात या प्रकरणी पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. लाखो रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून संबंधित विरुद्ध त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. अफरातफर झालेल्या या काळात पालिकेचा "कॅश बुक' योग्य प्रकारे लिहिला नाही. म्युनिसिपल अकाऊंट कोडचे योग्य प्रकारे पालन करण्यात आले नाही.

No comments: