मुख्यमंत्रिपद हुकल्याची हुरहूर
माझ्याविरुद्ध राजकीय कारस्थान
अशोक चव्हाण स्पर्धक, छे..
मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्रिपद हुकल्याने दुखावले गेलेले नारायण राणे यांनी आज मी कॉंग्रेसला संपवल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आपल्या पक्षत्यागाचे स्पष्ट संकेत दिले. यापुढे आपण कॉंग्रेसमध्ये कोणतेही पद घेणार नाही, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले आणि पक्ष योग्य वेळी सोडीन, असे सूचक उदगारही काढले.
नेतृत्वाने शब्द पाळला नाही, मी मुख्यमंत्री बनू नये यासाठी काही नेत्यांनी कारस्थान केले, कॉंग्रेसनेत्यांना लोकांची काहीही चिंता नाही, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रिपदासाठी लायक नसून ते माझे स्पर्धक होऊ शकत नाहीत, आमदारांची मते आजमावण्याचे नाटक केले गेले आदी आरोप राणे यांनी केले.
मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकरसिंह, तसेच दिल्लीतील एक नेता यांनी मिळून कट केला आणि अशोक चव्हाण यांचे नाव पुढे केले, असा दावा राणे यांनी केला.
ते म्हणाले की, यात विलासरावांनी अतिशय घाणेरडे राजकारण केले. आमदारांवर दबाव टाकला. कोणत्याही परिस्थितीत मी मुख्यमंत्री होऊ नये, यासाठी त्यांनी परवा रात्रीपासूनच प्रयत्न चालवले.
कोणत्याही कलंकाविना पायउतार होत असल्याचा विलासरावांचा दावा खोडून काढताना राणे म्हणाले की, मुंबईत दहशतवाद्यांच्या हल्ल्यांतील पाचशेवर बळी आणि जखमी हे पाप विलासरावांचेच आहे. ते राज्यावरील कलंक आहेत आणि त्यांचे कलंक मी पुढे जाहीर करीन.
निष्ठावंत या कल्पनेची टर उडविताना ते म्हणाले की, पक्षातून बाहेर जाऊन विधान परिषदेसाठी उभे राहायचे, शिवसेनाप्रमुखांच्या मातोश्री बंगल्यावर जाऊन मदत मागायची आणि नंतर कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व्हायचे (विलासरावसारखे) याला कॉंग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणतात !
अशोक चव्हाण हे माझे स्पर्धक नाहीत. ते एक खाते नीट सांभाळू शकत नाहीत. त्यांच्याजवळ गुणवत्ता नाही, नेतृत्वाचे गुण नाहीत. त्यांची काय लायकी आहे, असे आरोपही त्यांनी केले.
केंद्रीय निरीक्षकांनी आमदारांची मते आजमावण्याचे नाटक केले, असा आरोप करताना राणे म्हणाले की, याआधी निरीक्षक यायचे आणि निकाल जाहीर करायचे. पण यावेळी तसे झाले नाही. कॉंग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर माझा विश्वास राहिलेला नाही.
वास्तविक, जास्तीत जास्त (४०-५०) आमदारांनी माझ्या बाजूने कौल दिला होता आणि माझे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावयास हवे होते. पण कटकारस्थान करणा-यांनी हे होऊ दिले नाही, असाही आरोप त्यांनी केला.
अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करून कॉंग्रेसने शिवसेनेला पोषक निर्णय घेतला आहे, असा टोमणाही त्यांनी मारला.
तुमच्यासोबतच्या आमदारांची काय भावना आहे, असे विचारता राणे म्हणाले की, मी माझे मत सांगितले आहे. आमदार त्यांचे सांगतील.
वर्षा' वर निदर्शने, नारेबाजी
विलासरावांच्या "वर्षा' बंगल्याशेजारीच राणेंचा "ज्ञानेश्वरी' बंगला आहे. तेथे त्यांची पत्रपरिषद संपली आणि त्याचवेळी चव्हाण यांच्या नावाची घोषणा दिल्लीत झाली. त्यामुळे संतापून राणेसमर्थक वर्षावर चालून गेले आणि विलासरावांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले.
ज्ञानेश्वरी बंगल्याकडून लोंढ्याने कार्यकर्ते वर्षाच्या प्रवेशद्वाराकडे नारेबाजी करीत जाऊ लागले, तेव्हा पोलिसांना त्यांना आवरताना कठीण जात होते. हे लोक बंगल्यात घुसतात की काय, अशी स्थिती क्षणभर निर्माण झाली होती. परंतु, काही काळ घोषणाबाजी करून हे कार्यकर्ते ज्ञानेश्वरीकडे निघून गेले. ही घटना घडली तेव्हा विलासराव वर्षावर आणि राणे ज्ञानेश्वरीत हजर होते, हे विशेष!
Saturday, 6 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment