Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 5 December 2008

कोकण रेल्वेच्या कंटेनरात मिळाला कुजलेला मृतदेह

मडगावातील घटनाः पोलिसही चक्रावले - मंगळूरहून पार्सल
मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : मुंबईतील गेल्या आठवड्यातील घटनांचे प्रकरण ताजे असतानाच आज येथील कोकण रेल्वे स्टेशनवर एका सीलबंद कंटेनरमध्ये एक कुजलेला मृृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. नंतर पोलिसांना पाचारण करून तो कंटेनरच पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. तो हॉस्पिसियोच्या शवागरात ठेवण्यात आला आहे.
उद्या शुक्रवारी शवचिकित्सेनंतरच तो पुरुष की महिला ते उघड होणार आहे.
कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक वामन तारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या मे महिन्यात निळ्या रंगाच्या व ३ फूट ऊंचीच्या स्वरूपातील हे सीलबंद पार्सल मंगळूरहून आले होते व कोणीही दावा न केल्याने रेल्वेच्या स्टोअररूममध्ये पडून होते. रेल्वेच्या नियमावलीनुसार दावा न करता राहिलेली पार्सले तशीच ठेवली जातात व सहा महिन्यांचा काळ उलटताच उघडली जातात. नंतर त्यांचा लिलाव पुकारला जातो.
सदर पीव्हीसी पिंपाच्या स्वरूपातील पार्सल तथा कंटेनर सहा महिन्यांचा काळ उलटल्यानंतर सील फोडून उघडला असता त्यातून असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पार्सल विभागाचे श्रीधर भट यांनी कळविताच कोकण रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक हिरू कवळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येऊन पंचनामा केला. त्यांच्याकडून संदेश मिळताच अधीक्षक वामन तारी व उपअधीक्षक गुरुप्रसाद म्हापणे यांनी मडगावला भेट देऊन सदर कंटेनरची पहाणी केली व सर्व माहिती जाणून घेतली.त्यांनी कोकण रेल्वे स्टेशन अधिकाऱ्यांना या कंटेनरबाबतचे सर्व कागदपत्र लगेच सादर करण्यास सांगितले; मात्र सायंकाळपर्यंत कागदपत्रे सादर केली गेली नव्हती.
तो मृतदेह कपड्यात गुंडाळलेला तो मृतदेह फुगून कुजला आहे. कंटेनर जशाचा तसा हलविणेही दुर्गंधीमुळे पोलिसांना असह्य झाले होते.
मंगलोरहून तो कोणी व कोणाच्या पत्यावर पाठविला होता ती माहिती मात्र कोकण रेल्वेकडे मिळू शकली नाही. रेल्वे कामकाजातील ही हेळसांड असल्याचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी मान्य केले.
दरम्यान, खास सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी जोधपूरहून मडगावसाठी पाठवलेली बरीच पार्सले मंगळूरला पोंचली होती. नंतर ती मंगळूर वेर्णा लोकलमधून मडगावात आली. त्यात हेही पार्सल असावे असा कयास आहे. सदर कंटेनरवर "मडगाव' एवढाच उल्लेख आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार कोणीतरी खून करून विल्हेवाट लावण्यासी ते पार्सल पाठविलेले असावे. यावरून अशाप्रकारे येणाऱ्या पार्सलांची कोणतीच नोंद रेल्वेकडे नसते हे दिसून आले व त्यातून ताज्या सुरक्षा उपाययोजनेच्या अनुषंगाने रेल्वेच्या व्यवस्थेत अनेक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले.
अधिकृत दुजोरा मिळू न शकलेल्या वृत्तानुसार सीलबंद असतानाही सदर कंटेनरमधून असह्य दुर्गंधी येऊ लागल्यावर रेल्वे पार्सल विभागातील कोणा कर्मचाऱ्याने एका मालवाहू रिक्षावाल्याला बोलावून तो पिंप दूरवर नेऊन टाकायला लावला. तो पिंप दूरवर नेऊन रिकामा करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला मृतदेहाचा पाय बाहेर आलेला दिसला. त्यामुळे घाबरून त्याने तो पिंप परत आणून रेल्वेच्या लोकांच्या हवाली केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अर्थात, कोकण रेल्वे पोलिस अधीक्षक वामन तारी व जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. आज दिवसभर मडगावात याच प्रकाराची चर्चा सुरू होती.

No comments: