Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 30 November 2008

पाळीत पैशाचा धूर व यंत्रणेचा गैरवापर

भाजपचा घणाघाती आरोप
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांचा धूर तसेच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून कॉंग्रेस पक्षाने पाळी मतदारसंघ शाबूत ठेवला, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केला आहे. कॉंग्रेसचा हा नैतिक विजय नसून केवळ आकड्यांचा विजय असल्याचेही ते म्हणाले.पाळी मतदारसंघात भाजपचा पराभव आपण स्वीकारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.आज पणजी येथे भाजप मुख्यालयात पत्रपरिषदेत ते बोलत होते.यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.
गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला जास्त मते मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्षपदाची दोन वेळा जबाबदारी स्वीकारलेल्या डॉ.आमोणकर हे पक्षाबरोबर राहतील, असा विश्वास होता; परंतु त्यांनी वैयक्तिक अहंभावामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने मतविभाजन झाले. त्यामुळे कॉंग्रेसचा मार्ग अधिक सोपा झाला, भाजपकडे यावेळी नवीन मते आली. मात्र डॉ.आमोणकर यांची काही प्रमाणातील वैयक्तिक मते त्यांना गेल्याने भाजपला पराभव पत्करावा लागला,असे श्री. नाईक म्हणाले.
डॉ.आमोणकर यांच्याबाबतीत पक्ष कार्यकर्त्यांत पसरलेली नाराजी पाहता ही उमेदवारी त्यांना दिली असती तर भाजपला आत्ताच्यापेक्षा कमी मते मिळाली असती,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षातर्फे सरकारी यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल करूनही काहीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.अनेक सरकारी अधिकारी सरकारचे "एजंट' बनून त्यांना साहाय्य करीत होते,असा ठपकाही श्री.नाईक यांनी ठेवला.
दहशतवादी हल्ल्याचा निषेध
दरम्यान, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भाजपतर्फे निषेध करण्यात येत असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. गोव्याचे दोन सुपुत्र या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करायची परमेश्वर ताकद देवो,अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. गोव्यातही कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. सांकवाळ येथील पंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज काढणाऱ्या पंच सदस्याला मारहाण करणाऱ्या इतर पंच सदस्यांना अटक करण्याचे सोडून तक्रार दाखल करायला गेलेल्या त्याच्या भावालाच अटक करण्यात आल्याचा त्यांनी धिक्कार केला.मडकई मारहाणप्रकरणी एकाचा मृत्यू झाल्याने त्याचीही दखल पोलिस घेत नाहीत, असेही ते म्हणाले.

No comments: