मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी) - विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसचा नवा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनात झाली. कॉंग्रेसी परंपरेनुसार नवा नेता निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी देण्याचा ठराव आमदारांच्या बैठकीत संमत करण्यात आला. आता सर्व आमदारांशी चर्चा करुन कॉंग्रेस निरीक्षक आपला अहवाल सोनियांना देतील आणि त्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल.
कॉंग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज सकाळी राज भवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी आज सायंकाळी चार वाजता विधान भवनात कॉंग्रेस आमदारांची बैठक सुरु झाली. केंद्रीय विदेशमंत्री प्रणव मुखर्जी व महाराष्ट्राचे प्रभारी सरचिटणीस ए. के. अँटनी हे कॉंग्रेस निरीक्षक म्हणून यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे विलासराव देशमुख यांनी मांडला. पतंगराव कदम यांनी त्यास अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव संमत करण्यात आला.
आता विधान भवनात कॉंग्रेस निरीक्षक सर्व आमदारांना स्वतंत्रपणे भेटून त्यांची मते जाणून घेत आहेत. मुख्यमंत्री कोणाला करावे, याबाबत ते आमदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. त्यानंतर ते आपला अहवाल सोनिया गांधी यांना सादर करतील आणि मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय सोनिया गांधीच घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
राजीनामा दबावाखाली नाही : विलासराव
राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता. अतिरेकी हल्ल्यानंतर उसळलेल्या जनभावनेचा आदर करीत मीच राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आणि पक्षश्रेष्ठींनी तो स्वीकारला, असे सांगत मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आज निरोप घेतला.
राज्यपालांना राजीनामा सादर करण्याआधी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या आपल्या शेवटच्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन माझ्या गच्छंतीची परिस्थिती निर्माण केली, हे म्हणणे खरे नाही. कॉंग्रेसचे निर्णय आमचा पक्ष स्वत:च घेतो.
चित्रपटनिर्माते रामगोपाल वर्मा यांना ताज हॉटेलच्या पाहणी दौ-यात नेणे भोवले का, या प्रश्नावर विलासराव उत्तरले की, कोण माणूस कोणाबरोबर फिरला एवढ्या क्षु?क मुद्द्यावरून असे महत्त्वाचे निर्णय होत नसतात. तसे म्हणणे अन्यायकारक आहे. मात्र, ती एक चूक होती आणि त्याबद्दल मी माफी मागितली आहे आणि आजही मागतो.
आबा होणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
उपमुख्यमंत्रिपद गमावलेले आर. आर. उपाख्य आबा पाटील यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष नेमण्याचा आणि पक्षसंघटनेत व मंत्र्यांमध्येही फेरबदल करण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतला असल्याचे समजते.
सध्याचे प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन आबांसाठी ही जागा रिकामी केली जाणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आबाच प्रदेशाध्यक्ष होते. हे पद त्यांच्याकडे दुस-यांदा येत आहे. त्याद्वारे त्यांचा मान राखला जाईल आणि येत्या निवडणुकांमध्येही त्यांच्या प्रतिमेचा लाभ करून घेतला जाईल. कारण, पवारांनंतर आबा हेच पक्षाचा राज्यातील चेहरा सिद्ध झाले आहेत. कॉंग्रेसने मुख्यमंत्री मराठा समाजाचा केल्यास (तसेच होईल. कारण, सध्याच्या घडीला शर्यतीत असलेले तीनही नेते- नारायण राणे, अशोक चव्हाण व बाळासाहेब विखे पाटील मराठाच आहेत.) राष्ट्रवादी छगन भुजबळ यांच्या रूपात ओबीसी उपमुख्यमंत्री देणार आहे.
तथापि, गृहमंत्रिपदाचा त्यांचा तिढा अजून सुटलेला नाही. टॉपच्या एकाही नेत्याला आजच्या परिस्थितीत गृह खात्याचे लोढणे आपल्या गळ्यात नको आहे. पण शेवटी, जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्यापैकी एकाच्या गळ्यात ते बांधले जाण्याची शक्यता दिसत आहे.
नव्या मंत्रिमंडळाच्या निमित्ताने आपल्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही बदल करण्याचेही राष्ट्रवादीने ठरविले असल्याचे सांगण्यात येते. चांगल्या मंत्र्यांना पदोन्नती, तर अकार्यक्षम मंत्र्यांची सुट्टी, असे सूत्र वापरले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
कोण होणार मुख्यमंत्री?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नव्या नावांचीही चर्चा सुरु झाल्याने ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे हे या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहेत. मात्र बाळासाहेब विखे पाटील यांचे नाव आज नव्यानेच पुढे आले आहे. त्याशिवाय उद्योगमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा आहेच. आज रात्री उशिरा किंवा उद्याच नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होईल, असे समजते.
Friday, 5 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment