म्हापसा नगराध्यक्षांचा राजीनामा
म्हापसा, दि. १ (प्रतिनिधी)- म्हापसा नगराध्यक्ष स्नेहा भोबे यांनी आज आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेली दोन वर्षे म्हापसा शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील होते. परंतु, गोवा सरकार व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळत नसल्याने शेवटी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे स्नेहा भोवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
म्हापसा पालिकेला संबंधित खाते व प्रशासनातर्फे सापत्न वागणूक मिळत असल्याने गेली दोन तीन वर्षे विकासाची कामे होऊ शकली नाहीत. गेल्या तीन वर्षांत पालिकेला केवळ ३७ लाख अनुदान देण्यात आले. यातील २५ लाख रुपये हे वार्षिक अनुदान असून केवळ विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी थोडी रक्कम मंजूर झाली होती. एवढी रक्कम एखाद्या गावाच्या पंचायतीला अनुदान म्हणून देण्यात येते, पालिकेसाठी ही रक्कम तुटपुंजी ठरते. त्यामुळे पालिकेला एवढी कमी रक्कम अनुदानस्वरुप देणे एक प्रकारची चेष्टा असल्याचे सौ. भोबे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या दोन वर्षांच्या अनुभवानुसार "आम आदमी'चे सरकार त्याला केवळ "जाम' करत असल्याचे दिसून आले. शहराच्या विकासासाठी आजपर्यंत शंभराहून अधिक ठराव घेण्यात आले. परंतु, व्यावसायिक स्तरावर त्यांची अंमलबजावणी मात्र शक्य झाली नाही. राजकीय हस्तक्षेप व ढवळाढवळ यामुळे आपल्याला नगराध्यक्षपदाचा कंटाळा आला असून आपण अभिमानाने राजीनामा देत असल्याचे सौ. भोबे यांनी सांगितले.
सौ. भोबे पुढे म्हणाल्या की, एका महिन्यापूर्वी ऍड. सुभाष नार्वेकर यांच्या गटातील सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता, पण भाजप डगमगले नाही. आपल्या गटातील सर्व नगरसेवकांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून उच्च स्तरावरील गलिच्छ राजकारणामुळे या पदावर राहणे अशक्य असल्याने २७ नोव्हेंबर रोजी नगरविकास संचालकांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची त्यांनी सांगितले.
Tuesday, 2 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment