Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 3 December 2008

महाराष्ट्राच्या नेतेपदाचे दोन्ही चेंडू दिल्लीमध्ये!

*विलासरावांकडून मोठी मोर्चेबांधणी
*राष्ट्रवादीचे सर्वाधिकार शरद पवारांना

मुंबई, दि. २ (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोण असावे, हा वाद आता देशाच्या राजधानीत पोचला असून, त्याचा निर्णयही तेथेच, बहुदा उद्या अपेक्षित आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारासंदर्भात कॉंग्रेसकडून कोणीही आपली भेट घेतली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करीत शरद पवार यांनी आज ठरलेली कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक उद्यापर्यंत पुढे ढकलल्यामुळे हा निर्णय आणखी एक दिवस लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचा मुख्यमंत्री ठरत नाही, तोपर्यंत आमचा उपमुख्यमंत्री आम्ही ठरविणार नाही, अशी भूमिका पवार यांनी घेतली असल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री ठरविण्याचा सर्वाधिकार पक्षाच्या आमदारांनी पवारांना देण्याचा निर्णय आज मुंबईतील बैठकीत झाला. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्रिपदाच्या चाव्यादेखील पवारांच्या हाती गेल्याचे मानले जात आहे.
वास्तविक, काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत राष्ट्रपती प्रतिभा पाटील मुंबईत असल्यामुळे, राजशिष्टाचार पाळण्यासाठी विलासरावांबद्दलचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. दुपारनंतर अपेक्षित असलेला हा विलंबित निर्णय आता आणखी एक दिवस लांबण्याची चिन्हे दिसत आहेत.
याचे कारण, विलासरावांनी दिल्लीत लावलेली फिल्डिंग असल्याचे सांगितले जाते. काल स्वत:च पद सोडण्याची आपली तयारी जाहीर करणाऱ्या विलासरावांनी लगेच आपली माणसे कामाला लावून मुख्यमंत्रिपद वाचविण्याचे प्रयत्न जोरात सुरू केले. त्यानुसार, राज्य मंत्रिमंडळातील त्यांच्या निकटचे मंत्री, त्यांना मानणारे कॉंग्रेस व अपक्ष आमदार आणि इतर कॉंग्रेसनेते यांनी दिल्ली गाठली आणि विलासरावांना यावेळी काढणे कसे अयोग्य होईल, याचा प्रचार पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळात सुरू केला. याचवेळी त्यांच्या विरोधकांनीही दिल्लीला धाव घेत दुसरी बाजू लावून धरण्याचा प्रयत्न चालविला.
सायंकाळी आपली बाजू थोडी कमजोर पडत आहे, असे लक्षात येताच विलासरावांनी पर्यायी मुख्यमंत्री म्हणून आपल्या विश्वासातील बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे केल्याचे सांगण्यात येते. थोरात हे सध्या राज्याचे कृषिमंत्री असून, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे आमदार आहेत. तसेच ते मुख्यमंत्र्यांच्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्यास उत्तर महाराष्ट्राला प्रथमच या पदाची संधी मिळेल, असा युक्तिवाद विलासराव समर्थकांकडून केला जात असल्याचे कळते.
मराठ्यांचे राजकारण
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांचा घोळ होण्यामागे प्रामुख्याने मराठा राजकारण असल्याचे बोलले जाते.
विलासरावांच्या जागी कॉंग्रेसने पुन्हा मराठा नेता दिला, तर राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपदासाठी छगन भुजबळ (ओबीसी) यांचा विचार करू शकते. याउलट, मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होणार असतील तर राष्ट्रवादीचा वेगळा माणूस (शक्यतो दिलीप वळसे पाटील) उपमुख्यमंत्री होऊ शकतो. दोन्ही स्थितींमध्ये पुढाकार कॉंग्रेसलाच घ्यावा लागणार आहे आणि त्याचीच वाट राष्ट्रवादी पाहत आहे, असेकळते. समजा छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करावे लागले तरी, गृहमंत्रिपद त्यांना न देता दिलीप वळसे पाटील यांना देण्याचेही राष्ट्रवादीत घाटत असल्याचेही समजते.

No comments: