Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 4 December 2008

अजूनही तळ्यात-मळ्यात विलासरावांच्या राजीनाम्यावर अद्याप निर्णय नाही

नवी दिल्ली, दि. ३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दल आजही कोणताच निर्णय झाला नाही. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता.
कॉंग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुखांच्या राजीनाम्यावर अद्यापी कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळात कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी, ए.के.ऍन्टनी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते यांच्यात आज संध्याकाळी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्रातल्या युती सरकारमधील प्रमुख घटक पक्ष आहे.
एका बाजूला पक्ष नेतृत्वाला राज्यात बदल हवा आहे तर दुसऱ्या गटाच्या म्हणण्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी काही महिने अगोदर राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही. महाराष्ट्रातील घडामोडींबाबत ए.के.ऍन्टनी यांनी काल दिवसभरात देशमुख यांच्यासह पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर निर्णय घेतला नसल्याची माहिती बातमीदारांना दिली. देशमुख यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी पक्षाच्या निर्णयाचे आपण पालन करु असे मुख्यमंत्री देशमुख यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा झाल्यावर देशमुख मुंबईत परतले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपला राजीनामा सोमवारीच दिला होता. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विलासराव देशमुख यांच्यावर मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी दबाव वाढला होता.

No comments: