Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 4 December 2008

दहशतवाद्यांना सोपविण्याची मागणी झरदारी यांनी फेटाळली

न्यूयॉर्क, दि. ३ : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात नसल्याचे स्पष्ट करून पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी लष्कर- ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदसह अन्य २० जहाल दहशतवाद्यांना सोपविण्याची मागणी फेटाळून लावली. तसेच मुंबईत अटक झालेला दहशतवादी पाकिस्तानी असल्यावरही त्यांनी संशय व्यक्त केला.
मुंबई हल्ल्याचा तीव्र विरोध करताना भारताने दोन दिवसांपूर्वी २० जहाल दहशतवाद्यांना सोपविण्याची पाकिस्तानकडे मागणी केली होती. ही मागणी देखील झरदारी यांनी फेटाळून लावली आहे.
आम्हाला पुरावे देण्यात आले तर आम्ही या आतंकवाद्यांविरुद्ध आमच्या न्यायालयांमध्ये खटले दाखल करू आणि आम्हीच त्यांना शिक्षा करू, अशी सारवासारव झरदारी यांनी मंगळवारी रात्री सीएनएन वाहिनीवरील "लॅरी किंग लाईव्ह' या कार्यक्रमात बोलताना केली.
अनेक दहशतवादी घटनांमध्ये हव्या असलेल्या २० जहाल आतंकवाद्यांच्या नावांची यादी भारताने पाकिस्तानकडे दिली होती. त्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, लष्कर-ए­- तोयबाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद, जैश- ए- मोहम्मद प्रमुख मसूद अझहर यांच्या नावांचा समावेेश आहे.
भविष्यातील कारवाई आणि पर्यायांवर विचार करण्यापूर्वी भारत यासंदर्भात पाकिस्तानच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. भारताला आपल्या भूमीचे रक्षण करण्याचा अधिकार असून यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल. कारण पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा आता अगदी मुळापासून सफाया करण्याची वेळ आली आहे असे देशाला वाटत असल्याची प्रतिक्रिया विदेशमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. सोबतच पाकिस्तानात असलेल्या दहशतवादी शिबिरांवर लष्करी कारवाई करण्याचेही त्यांनी नाकारले नाही.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांदरम्यान भारतीय सुरक्षा दलांनी ज्या बंदुकधारी आतंकवाद्याला अटक केली, तो पाकिस्तानी असल्यावरच आपल्याला संशय आहे, आणि तो पाकिस्तानी असल्याचे सिद्ध होईल असा कोणताही पुरावा आम्हाला देण्यात आला नाही असे झरदारी म्हणाले. त्याचप्रमाणे भारतावर झालेल्या सर्वात मोठया दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात नसल्याचे सांगून दहशवाद्यांना कोणत्याही देशाबद्दल काहीच घेणे-देणे नसते असे झरदारी म्हणाले.
संपूर्ण जगावर ताबा मिळविण्याची, सर्वसामान्यांना हादरवून सोडण्याची असुरी इच्छा बाळगणाऱ्या लोकांनीच भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला केला. यात पाकिस्तानचा हात नाही. यासंदर्भात व्हाईट हाऊस व अमेरिकन गुप्तचर संघटना सीआयएनेही पाकला क्लीन चिट दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता खारीज करतानाच लोकशाहीवर विश्वास ठेवणारे देश युद्धाकडे अग्रेसर होत नाहीत. पाकमध्ये हुकूमशाही असताना भारत व पाकिस्तानदरम्यान तीन युद्धे झालीत. मात्र ही वेळ संयुक्तपणे चौकशी करून समस्येवर तोडगा काढण्याची आहे. मुंबई किंवा भारतालाच नव्हे तर पाकिस्तान,अफगानिस्तानसह संपूर्ण जगालाच दहशतवादाचा धोका असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
मी, माझा देश आणि आम्ही सर्वच दहशतवादाचा सध्या सामना करीत आहोत. दहशतवादामुळे कुटुंब कसे उद्ध्वस्त होते ते मी बघितले आहे. मी जेव्हा माझ्या मुलांकडे बघतो तेव्हा मला त्याच्या भयाणतेची जाणीव होते. त्यांच्या डोळ्यात मला भय दिसते. माझी पत्नी बेनझीरमुळे हे दु:ख माझ्या वाट्याला आले आहे, अशी भावना पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनीही अन्य पाकिस्तानी नेत्यांप्रमाणेच गुळमिळीत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ही जगाने बंदी घातलेली दहशतवादी संघटना आहे. आणि लष्करचा या हल्ल्यामागे हात असल्याची माहिती आम्हाला नाही. अल कायदासारख्या जहाल संघटना तर आपण विचारही करणार नाही, अशा प्रकारे ती संघटना कारवाया करीत असते. असे असले तरी या हल्ल्यासंदर्भात संपूर्ण सहकार्याचे पाकिस्तानने भारताला आश्वासन दिले आहे.
आम्ही अण्वस्त्रांवर बंदी घालण्याचे समर्थक असून दक्षिण आशियाला जर अण्वस्त्रमुक्त करायचे असेल तर भारतानेही या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी केले.
-----------------------------------------------------
ओसामा पाकमध्ये असल्याचे वृत्त कपोलकल्पित : झरदारी
न्यूयॉर्क, दि. ३ : संपूर्ण जगाला हादरविणारी जहाल दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात लपून असल्याच्या वृत्तात तत्थ्य नसून ते कपोलकल्पित असल्याचे सांगतानाच दहशतवादी कारवायांसाठी संपूर्ण जगाला हवा असलेला लादेन जर पाकिस्तानात सापडला तर त्याची तमा बाळगली जाणार नाही. त्याला अटक करून कठोर शिक्षा ठोठावली जाईल असे पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारींनी म्हटले आहे.
अमेरिका, अन्य देशांचे सुरक्षा दल आणि गुप्तचर संघटना गेल्या आठ वर्षांपासून लादेनच्या मागावर आहेत. त्यांच्याकडे आमच्या तुलनेत अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानही आहे. असे असताना त्यांना अद्याप अल कायदाच्या प्रमुखाला शोधून का काढता आले नाही असा प्रश्नही पाकच्या राष्ट्राध्यक्षांनी विचारला.
--------------------------------------------------------
पाकची अण्वस्त्रे सुरक्षित : झरदारी
न्यूयॉर्क, दि. ३ : पाकिस्तानातील अण्वस्त्रे सुरक्षित आहेत. त्यामुळे ती दहशतवाद्यांच्या हाती पडण्याचा धोका नाही असे आश्वासन पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी जागतिक समुदायाला दिले आहे.
अण्वस्त्रांना अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले असून त्यांच्यासाठी आमच्याकडे नियंत्रण प्रणाली आहे. अत्यंत जबाबदारीने आम्ही त्यांचे रक्षण करीत आहोत असेही पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
लवकरच दहशतवादी एखाद्या महत्त्वपूर्ण शहरावर विध्वंसक अस्त्रांच्या आधारे हल्ला करतील. यासाठी ते अस्थिर राजकीय स्थिती असलेल्या पाकिस्तानमधून अण्वस्त्रांसारखे घातक अस्त्र मिळविण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, अशा शब्दात अमेरिकेने पाकला इशारा दिला होता. याकडे लक्ष वेधले असता झरदारी म्हणाले, मी संपूर्ण जगासोबतच आमच्या शेजाऱ्यांना अशी अपील करतो की त्यांनी एकत्रितपणे या समस्येवर तोडगा शोधावा.

No comments: