पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): मुंबईत घुसलेले दहशतवादी समुद्रमार्गे आल्याचे नक्की झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने गोवा कोस्टल पोलिसांना एप्रिल २००९ पर्यंत मोठ्या व मध्यम आकाराच्या शस्त्रसज्ज बोटी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. केंद्राने देशातील किनारी भागांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व राज्यांतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावली असून आज रात्री गोव्याचे पोलिस महानिरीक्षक दिल्लीला रवाना झाले.
उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्यास दोन बोटी पुरवल्या जाणार असून, एका बोटीची क्षमता १२ टन इतकी असेल व ती १२ नॉटिकल मैलाहून अधिक अंतर गाठू शकेल तर दुसऱ्या बोटीची क्षमता ५ टन असून ती १२ नॉटिकल मैलाच्या आत सक्रिय असेल. याशिवाय केंद्रीय मंत्रालयाने बोलवलेल्या बैठकीत किनारी भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सुरक्षा रक्षकांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने सारासार विचार केला जाईल. तसेच किनारी भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भविष्यात घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांवरही चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने गोव्यातील किनारी भागांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकूण नऊ बोटी पुरवण्याचे आदेश दिले आहेत. या बोटी गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे तयार केल्या जाणार असून, त्यात ६ मोठ्या आणि तीन मध्यम आकाराच्या बोटींचा समावेश असेल. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारद्वारे या बोटींसाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे.
केंद्राने जरी सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या असल्या तरी गोवा सरकार मात्र सुस्त असल्याचे सांगितले जाते. एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जवळपास ८० नवी पदे तयार करण्यात आली असून, त्यात तांत्रिकबाजू सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाचाही समावेश आहे. मात्र अद्याप त्यांची नियुक्ती करण्यात आली नसून, हा प्रस्ताव सरकार दरबारी जवळपास ६ महिन्यांपासून शीतपेटीत पडून आहे. राज्यात तीन किनारी पोलिस स्थानके असून, मुरगाव बंदर, बेतूल आणि शिवोलीत असलेल्या या पोलिस स्थानकांवर ६५ पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. २५ पोलिस मुरगाव बंदरावर असून, शिवोली आणि बेतूल याठिकाणी प्रत्येकी १५ पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत.
Thursday, 4 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment