जयपूर, दि. ४ - राज्यातील काही मतदार संघात उफाळलेला जातीय हिंसाचार आणि उमेदवारांच्या समर्थकांमधील संघर्षादरम्यानच राजस्थान विधानसभेच्या एकूण २०० जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६५ टक्के मतदारांनी आपला हक्क बाजावला. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री वसुंधरा राजे, कॉंग्रेस महासचिव अशोक गेहलोत, राजस्थानच्या माजी विधानसभा अध्यक्ष सुमित्रा सिंग, पीसीसी अध्यक्ष सी.पी.जोशी यांच्यासह २१९४ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतपेटीत बंद झाले. यात कॉंग्रेसच्या २००, भाजपाच्या १९३, बसपाच्या १९९ आणि १०१९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
कोटा जिल्ह्याच्या लाडपुरा मतदार संघातील बडीखेरा गावात उग्र जमावाला पांगवण्यासाठी सीआरपीएफ जवानांना हवेत गोळीबार करावा लागला. गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिस महासंचालक के.एस.बैन्स यांनी दिली. तेथेच करौली जिल्ह्यातील टोडा भीम परिसरात एका मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचे तर काही ठिकाणी राजकीय पक्षांत हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे.
जयपूर, अजमेर आणि सवाई माधोपूर जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) ऐनवेळी बिघाड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद झुत्शी यांनी सांगितले. व यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फेरमतदान घेतले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
राजस्थानचे राज्यपाल एस.के.सिंग आणि त्यांच्या पत्नी मंजू यांना जयपुरातील हवासरक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी बराच वेळ तात्कळत उभे राहावे लागल्याची माहितीही मिळाली आहे.
Friday, 5 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment