Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 30 November 2008

डाडा.. डाडा... या आर्त किंकाळीनंतर मोबाईल हातून निसटला तो कायमचा

प्रीतेश देसाई
पणजी, दि. २९ - मुंबईतील "हॉटेल ताज'मध्ये पाकिस्तानी भेकड दहशतवाद्यांच्या बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडलेला गोव्यातील २३ वर्षीय तरुण शेफ(आचारी) बोरिस दो रेगो याच्यावर आज सायंकाळी दिवाडी येथे हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोरिस याचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि गोव्यातील "हॉटेल ताज'चे पदाधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळी गृहमंत्री रवी नाईक व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिवाडीतील मयत बोरिस याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. सकाळी विमानाने बोरिस याचा मृतदेह गोव्यात आणण्यात आला. "बोरिस हा गोव्यात पंचतारांकित हॉटेलमधे येणार म्हणून होता, मुंबईत चांगला अनुभव जास्त मिळेल त्यामुळे मीच त्याला गोव्यात येऊ नको असे म्हटले, त्याचे दुख आज जास्त होते,' अशी खंत त्याचे वडील आणि हॉटेल ताजचे माजी शेफ उरबानो रेगो यांनी व्यक्त केली. केव्हिन हा थोरला व बोरिस हा धाकटा मुलगा. विज्ञान शाखेची पदवी मिळवल्यानंतर त्याने मिरामार येथे "आयआयएएस'मधून केटरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर तो दिल्लीत एका हॉटेलमधे प्रशिक्षण घेण्यास गेला. तेथूनच तो गेल्या ऑगस्ट महिन्यात "हॉटेल ताज'मध्ये रुजू झाला होता. या घटनेच्या काही दिवसापूर्वी म्हणजे १५ ते १७ नोव्हेंबरला रजा काढून घरी आला होती. मात्र त्याच दरम्यान हॉटेलमधे "इटालियन फुड फेस्टिवल'चे आयोजन केल्याने त्याला त्वरित बोलावून घेण्यात आले. त्यामुळे तो रजा संपण्यापूर्वीच निघाला होता.
मुलाच्या मृत्यूपेक्षा हॉटेल जळताना पाहिलेले दृश्य मला अधिक दुःख देऊन गेले, अशी प्रतिक्रियाही उरबानो यांनी व्यक्त केली. "त्या दिवशी फुटबॉल मॅच पाहण्यासाठी टीव्ही लावला असता दहशतवाद्यांनी हॉटेलमधे बेछूट गोळीबार करून निरपराध पाहुण्यांचे प्राण घेतल्याचे भयानक चित्र पाहायला मिळाले. त्यावेळी त्वरित बोरिसशी संपर्क साधला. त्याने त्यावेळी आपण सुखरूप असल्याचे सांगितले. त्याच्याबरोबर अन्यही शेफही होते. त्यावेळी पहाटेचे ३ वाजले होते. आम्ही दर पंधरा मिनिटांनी त्याच्याशी संपर्क साधत होचो. पहिल्यावेळी दूरध्वनी केला त्यावेळी बोरिस तळमजल्यावर होता. त्यावेळी त्याने त्या हॉटेलच्या एका जाणत्या वेटरला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार करताना पाहिले. ही माहिती बोरिसने मोबाईलवरून दिली. त्यानंतर काही मिनिटात त्याने आम्ही वरच्या मजल्यावर जात असल्याचे सांगितले. रात्री मला झोपच लागत नव्हती. बोरिसने मला झोपायला जा, असेही सांगितले होते. पण मी जागाच होतो. राहवले नाही म्हणून पुन्हा पहाटे ४.३० वाजता बोरिसशी मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी बोरिस एकदम दबक्या आवाजात केव्हिन... केव्हिन...त्यानंतर डाडा...डाडा...हे दोन शब्द मी त्याच्या तोंडातून एकले आणि मोबाईल खाली पडला...
त्यावेळी बोरिसच्या पोटाच्या दहशतवाद्यांची गोळी लागली होती. सुमारे वीस मिनिटे तो तसाच पडून राहिल्याने आणि रक्त वाहत राहिल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचठिकाणी दहशतवाद्यांनी एका महिला शेफची गोळ्या घालून हत्या केली होती, अशी माहिती आपल्याला मित्रांकडून मिळाली आहे, असे उरबानो यांनी "गोवा दूत'शी बोलताना सांगितले.


"आम्ही कॉंग्रेसचे असे सांगायचीही लाज वाटते'
हॉटेल ताजमधे दहशतवाद्यांचा बळी ठरलेला बोरिस रेगो याच्या कुटुंबीयाची गोवा सरकारने साधी दखलही घेतलेली नाही. मुख्यमंत्री तब्बल तीन दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हॉटेलच्या व्यवस्थापनेनेच बोरिसचा मृतदेह विमानाने गोव्यात पाठवला. तो विमानतळावरुन आणण्यास एक पोलिस शिपाईही सरकारने तेथे पाठवला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया बोरिसच्या याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या तरुणांनी व्यक्त केली. आम्ही सर्व कॉंग्रेसचेच कार्यकर्ते. पण आज आम्हाला कॉंग्रेस हा शब्द म्हणायचीही लाज वाटते. आमचे नाव उघड झाल्यास उद्या आम्हांला पक्ष कार्यालयात बोलावून आम्ही खरडपट्टी काढली जाईल. राहवत नाही म्हणून सांगतो जर "मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असते तर त्यांनी सर्वतोपरी मदत केली असती,' अशी प्रतिक्रिया या तरुणांनी दिली. बोरिसच्या कुटुंबीयाला सरकारचा पैसा नको आहे. पण गोव्याचा एक तरुण दहशतवादी कारवयांत गतप्राण होतो आणि सरकार साधी दखलही त्याची घेत नाही, याचीच सर्वाधिक टोचणी त्यांना लागून राहिली आहे.

No comments: