पोलिसी निष्क्रियतेचा इरसाल नमुना
पणजी, दि. १ (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत दहशतवाद्यांनी घातलेल्या थैमानानंतर देशभरात जे संशयाचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे, त्याला गोवाही अपवाद नाही. समुद्र किनारे आणि सुशेगाद पोलिस खाते यामुळे हे राज्य "सॉफ्ट टार्गेट' मानले जात असल्याने तर येथील नागरिक भीतीच्या छायेखालीच राहात आहेत. कोणत्या ठिकाणी कधी काय होईल, याचा नेम नाही. या स्थितीला सामोरे जाण्यास गोवा पोलिस कसे "अपात्र' आहेत, याचा प्रत्यय रविवारी बार्देश तालुक्यातील एका खेडेगावातील रहिवाशांना आला.
घटना छोटीशीच पण काय होऊ शकेल याचे भयावह चित्र उभी करणारी. आपल्या गावात कोणीतरी अनोळखी तरुण मोटारसायकलने आले आहेत, त्यापैकी एक जण पाकिस्तानी नागरिक आहे, याचा सुगावा लागल्याने काही जागृत नागरिकांनी "१००' क्रमांकावर फोन केला. वेळ होती रात्री दहाची. ते दोघे तरुण कोणत्या ठिकाणी गेले आहेत, याचीही माहिती रहिवाशांनी पोलिसांना कळविली. संशयाला जागा होती कारण यापैकी एक तरुण दोन वर्षापूर्वी याच गावात अधूनमधून येत असे, त्याने एका कुटुंबातील दोघी मुलींशी जवळीक केली होती. मैत्रीच्या नात्याने तो तेथे येत असे. त्यावेळी याच तरुणाच्या शोधार्थ आलेल्या पोलिसांनी लोकांशी विचारपूस केली होती, तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलिसांनीच त्यावेळी सांगितले होते. तो त्यानंतर कधीच दिसला नाही. लोकही त्याला विसरून गेले होते. आता अचानक तोच तरुण पुन्हा प्रकटला, त्यावेळी त्याच्याविषयी रहिवाशांना संशय आला. मुंबईला दोनच दिवसांपूर्वी स्फोट झाले होते, त्यामुळे या संशयिताबद्दल लोकांच्या मनात पाल चुकचुकली. एक-दोघांनी थेट "१००' क्रमांकावर संपर्क साधून किमान त्याची चौकशी करा म्हणजे संभाव्य अनर्थ टळू शकेल, असे पोलिसांना सुचविले! पोलिसांनी नेहमीच्या सवयीने आपण आपल्या जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा, असे उलटेच सुनावले! त्या रात्री पोलिस तेथे फिरकलेच नाहीत. तो तरुणही पुन्हा कुठे दिसला नाही. कदाचित एखाद्या कटातही गुंतला असण्याची शक्यता आहे. तो ज्याठिकाणी गेला होता, तेथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता म्हणजे तब्बल १४ तासांनी हळदोणे पोलिसांनी चक्कर टाकली खरी; पण विशेष माहिती हाती लागली नाही, असे ते सांगतात. रडत गेलेली व्यक्ती एखाद्याच्या मृत्यूचीच बातमी आणते, अशी एक म्हण आहे. पोलिसांना ती तंतोतंत लागू पडते. तो ज्यांना भेटायला गेला होता, त्यांच्याशी त्याचा "संपर्क'क्रमांक अथवा पत्ता मिळू शकेल, या दृष्टीने चौकशी करण्यात आली का?
जर तो तरुण खरोखरच अतिरेक्यांशी संबंधित असेल तर...आता याची सारी जबाबदारी गृहमंत्रालयावर; सर्व काही ठाकठीक असल्याचा दावा करणारे रवी नाईक पोलिसांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काही करणार आहेत का? प्रथम त्यांना आपली मानसिकता बदलावी लागेल, अशा घटना गांभीर्याने घेण्याचा आदेश द्यावा लागेल. नपेक्षा...आलीया भोगासी असावे सादर असे म्हणत गोमंतकीयांना दिवस काढावे लागतील. समुद्रकिनारे, वास्कोच्या इंधन टाक्या, महत्त्वाची ठिकाणे यासाठी कोणती सुरक्षा अस्तित्वात आहे, ते एकदा स्थानिक सरकारने जनतेला सांगावे.जनतेच्या मनातील भीती घालवण्याची जबाबदारी आपली आहे, याचाही विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे का?
Tuesday, 2 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment