कमल हसनची खास उपस्थिती
पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - "३९ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०८' चा समारोप उद्या २ रोजी संध्याकाळी ५ वाजता येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते,दिग्दर्शक कमल हसन प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले असले तरी त्याबाबत काही प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पर्शियन फिल्म " द सॉग ऑफ स्पॅरोज' ने महोत्सवाची सांगता होणार आहे.
देशातील ३९ वा तर गोव्यातील हा पाचवा महोत्सव असून यंदा या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधींचा प्रतिसाद लाभला. या समारोप सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव नीरज कुमार, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम.खान, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव आदी उपस्थित असतील. मुंबई येथील दहशतवादी हल्ला व माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे निधन यामुळे या महोत्सवातील उत्साह काही प्रमाणात ओसरला. तथापि, चित्रपट चाहत्यांनी या महोत्सवात दर्जेदार चित्रपटांचा मनसोक्त आनंद घेतला. राज्यात राष्ट्रीय दुखवटा घोषित करून स्थानिक पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला. या महोत्सवानिमित्त गोव्यात आलेल्या विविध प्रादेशिक तथा विदेशी प्रतिनिधींनी आता आपल्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली आहे.
उद्या समारोप सोहळ्यावेळीही सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले असून केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत.
सुवर्ण मयूराची घोषणा
"इफ्फी'समारोपावेळी सुवर्ण मयूर पुरस्कार कुणाला मिळणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.. चित्रपट महोत्सवाचा हा सर्वांत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. यंदा या पुरस्काराची रक्कमही वाढवण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
Tuesday, 2 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment