Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 30 November 2008

पाळी कॉंग्रेसकडेच

प्रताप गांवस यांचा १५३४ मतांनी विजय दृष्टिक्षेपात निकाल
प्रताप गावस यांना ७८६७ मते
डॉ. प्रमोद सावंत यांना ६३३३ मते
डॉ. सुरेश आमोणकरांना ३६८२ मते

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - भाजपचे बंडखोर नेते डॉ.सुरेश आमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा लाभ उठवत पाळी मतदारसंघावर पुन्हा एकदा आपला झेंडा रोवण्यात कॉंग्रेसला यश मिळाले आहे. पक्षाचे उमेदवार तथा माजी आमदार स्व.गुरूदास गावस यांचे बंधू प्रताप गावस यांचा १५३४ मतांच्या आघाडीने विजय झाला. त्यांना एकूण ७८६७ मते मिळाली. भाजपचे उमेदवार डॉ. प्रमोद सावंत यांना ६३३३ तर, अपक्ष उमेदवार डॉ.सुरेश आमोणकर यांनी ३६८२ मते प्राप्त केली. सेव्ह गोवा फ्रंटचे जुझे लोबो यांना १५८ व अन्य अपक्ष उमेदवार राजेंद्र राणे यांना ३५१ मते मिळवली.
पणजी कांपाल येथे गोवा गृहविज्ञान महाविद्यालयात सकाळी ठीक ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. एकूण तीन टप्प्यांत घेतलेल्या मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांत प्रताप गांवस यांनी आघाडी मिळवली, तर शेवटच्या फेरीत भाजपचे डॉ.सावंत यांना केवळ २३८ मतांची आघाडी घेता आली. एकूण १८३९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सरकारची विश्वासार्हता सांभाळण्यासाठी कॉंग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवून जोरदार प्रचार करूनही त्यांना अपेक्षित आघाडी मात्र अजिबात घेता आली नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.डॉ.आमोणकर यांनी उमेदवारी नाकारल्याच्या रागातून भाजपशी केलेल्या बंडखोरीमुळेच कॉंग्रेसला ही जागा परत मिळवता आली, हे निकालाच्या आकड्यांव्दारे स्पष्ट झाले आहे. भाजप व डॉ.आमोणकर या दोघांना मिळालेल्या मतांची बेरीज १००१५ होते, त्यामुळे या मतांत पडलेली फूट कॉंग्रेसच्या पथ्यावर पडल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती
गेल्या २००२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व.गांवस हे १५९१ मतांच्या आघाडीने निवडून आले होते. यावेळी प्रताप गांवस हे १५३४ मतांच्या आघाडीने निवडून आले, त्यामुळे पाळी मतदारांवर सरकार पक्षाच्या प्रचाराचा काहीही परिणाम झाला नसल्याचे उघड झाले आहे. गेल्यावेळी म.गो पक्षाचे उमेदवार महेश गांवस यांनी ४०३२ मते मिळवली होती. यावेळी डॉ.आमोणकर यांनी ३६८२ मते मिळवल्याने कॉंग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेसच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस सरकार सत्तेवर असूनही मोठी आघाडी मिळवता आली नाही,असा सवाल केला असता मुख्यमंत्री कामत यांनी या मतदारसंघात कॉंग्रेसला तसे स्थान नव्हतेच, तरीही जनतेने कॉंग्रेसवर विश्वास दाखवला. आघाडीपेक्षा विजय मिळाला हे महत्त्वाचे असे सांगत या विषयाला बगल दिली.
चोख प्रत्युत्तर ः डॉ.आमोणकर
आपल्याला कारण नसताना उमेदवारी नाकारण्यात आले. आपण पक्षाशी कोणतीही बंडखोरी केली नाही. काही खास कारणांमुळे आपणास अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली,अशी प्रतिक्रिया डॉ.आमोणकर यांनी व्यक्त केली. निवडणुकीचा निकाल हे भाजपला चोख प्रत्युत्तर असल्याचेही ते म्हणाले.
मतदारांची नावे गहाळ झाल्यानेच पराजय ः डॉ.सावंत
पाळी मतदारसंघातील मतदारयादीतून अनेक मतदारांची नावे ऐनवेळी गहाळ झाल्याचे डॉ.प्रमोद सावंत म्हणाले.या मतदारांना मतदानाचा हक्क मिळाला नाही, त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले. राणे पितापुत्रांनी प्रत्यक्ष कॉंग्रेससाठी सक्रिय काम केल्याने कॉंग्रेसचा विजय झाला,असेही ते म्हणाले. डॉ.आमोणकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने भाजपची मते विभागली गेली व त्याचमुळे भाजपला पराजयाचा सामना करावा लागला, हे त्यांनी मान्य केले.
स्व.गांवस यांची पुण्याईः प्रताप गांवस
पाळी मतदारसंघाचा कायापालट करण्याचे स्वप्न स्व.गुरूदास गांवस यांनी बाळगले होते. पराजयाचा सामना करीत अखेर त्यांनी यश मिळवले, परंतु प्रत्यक्षात काम करण्याची संधी हाती आली असता त्यांचा देहांत झाला. स्व.गांवस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडून देण्याच्या केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्यानेच आपला विजय झाला,असे प्रताप गांवस म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे व सभापती प्रतापसिंग राणे यांचे प्रचारातील योगदान महत्त्वाचे ठरले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर व सर्व पक्ष कार्यकर्ते हेच या विजयाचे खरे मानकरी आहेत असे ते म्हणाले.

No comments: