Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 4 December 2008

'तो' हवालदार आणि शिपाईसुद्धा निलंबित: 'चेक नाक्या'वरील हलगर्जीपणा

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): पत्रादेवी "चेक नाक्यावर' पैसे आकारून वाहने सोडत असल्याचे उघड होताच निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्यापाठोपाठ त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार दत्ताराम परब व पोलिस शिपाई आत्माराम गावकर यांना आज (बुधवारी) निलंबित करण्यात आले. काल रात्री पोलिस खुद्द महानिरीक्षक किशन कुमार यांनी या चेक नाक्यावर टेहळणी करून त्यानंतर छापा टाकला होता. चेक नाक्यावर पैसे आकारून वाहने जाण्यास दिली जात असल्याूद्दल त्यांची खात्री पटताच त्यांनी थेट या कृत्याला पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक आल्बुकर्क यांना जबाबदार धरून निलंबित केले होते. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई झाल्याने आज दिवसभर पोलिस मुख्यालयात दबक्या आवाजात त्यासंदर्भात चर्चा सुरू होती.
चेक नाक्यावर तपासणीकामी हलगर्जीपणा केल्याने तिन्ही पोलिसांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही चौकशी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना करण्यास सांगितल्याची माहिती महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिली. चेक नाक्यावर वाहनांची तपासणी करण्याचे कडक आदेश देऊनही त्यांचे पालन केले जात नसल्याने ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही समस्या गांर्भीयाने घेतली आहे. पैसे घेऊनच वाहने सोडायची असतील तर चेक नाक्यावर पोलिसांची गरजच काय, असा संतप्त सवाल करीत शंभर टक्के वाहनांची तपासणीही करणे शक्य नसले तरी, पैसे घेऊन वाहने जायला देणे पोलिसांना शोभणारे नाही, अशी प्रतिक्रिया श्री. कुमार यांनी आज दिली.
या घटनेमुळे धास्तावलेल्या काणकोण पोलिसांनी आज सायंकाळी काणकोण चेक नाक्यावर हेल्मेट न घालता येणाऱ्या दुचाकी चालकांना "तालांव' देण्यात सपाटा लावला. यावेळी तेथे असलेले पोलिस मात्र आपल्या ओळखीच्या व्यक्तींना कोणताही दंड न देता जाऊ देत होते. याविषयी पोलिसांना काही दुचाकीस्वारांनी विचारले असता, तुम्ही काय ते न्यायालयात सांगा, असे त्यांना पोलिसांकडून सांगितले जात होते, असे वृत्त आमच्या पैंगीण वार्ताहराने दिले आहे.

No comments: