Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 3 December 2008

विधानसभेचे खास अधिवेशन बोलवा गोव्याच्या सुरक्षेवर व्यापक चर्चा हवीच: भाजप

पणजी,दि.२ (प्रतिनिधी): मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा गोव्यासाठी धोक्याची घंटाच असून येत्या काळात दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी गोवा सज्ज आहे का, याबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गोव्याच्या सुरक्षेबाबत व्यापक चर्चा होण्याची आहे. तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आवश्यक कायदा तयार करण्याचीही आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ सुरक्षेबाबत चर्चेसाठी सभापती प्रतापसिंग राणे यांनी खास विधानसभा अधिवेशन बोलवावे,अशी मागणी भाजपचे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप विधिमंडळ प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते. मुंबईत होणारे दहशतवादी हल्ले व बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर गोव्याने धडा घेण्याची गरज आहे. गोव्याच्या सुरक्षेची चिंता केवळ भाजपला आहे,असा गैरसमज कुणी करून न घेता हा सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे, त्यामुळे गोव्यात जनता कशी सुरक्षित आहे व सुरक्षेची नक्की कोणती उपाययोजना राज्य सरकारने आखली आहे, याची माहिती सर्वसामान्य जनतेला होण्याची गरज आहे,असे मतही आमदार डिसोझा यांनी व्यक्त केले. याप्रकरणी एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज असून जनतेला विश्वासात घेण्याची नितांत गरज असल्याचेही आमदार म्हणाले. बाटलू प्रकरण, सेंट ऍण्ड्र्यू चर्चमधील स्फोट तसेच कर्नाटक येथे अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून गोव्यातील हालचालींबाबत मिळालेले संकेत या सर्व घटना पाहता येथील जनतेत सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक असल्याचे आमदार डिसोझा म्हणाले. गेल्या नाताळ व नववर्षाच्या निमित्ताने गोवा हे दहशतवाद्यांच्या नकाशावर असल्याचे संकेत गुप्तहेर संघटनांकडून मिळाले होते, त्यामुळे आता लवकरच नववर्षाच्या निमित्ताने एकूण राज्याच्या सुरक्षेसंबंधी सखोल व व्यापक चर्चा होण्याची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक वेळी केंद्रीय सुरक्षा दलावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. सुरक्षेसंबंधी पायाभूत सुविधा उभारणे, गुप्तहेर यंत्रणेला सज्ज करणे, तसेच आवश्यक रुग्णवाहिका,अग्निशमन वाहने व अद्ययावत शस्त्रे आदींची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी लागणार असल्याने त्यामुळे विधानसभेत चर्चा आवश्यक असल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभेत सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेबाबत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना सरकारकडून मिळालेल्या उत्तरांनुसार दहशतवादाचा सामना करण्यासाठी सरकारची तयारी अपुरी असल्याचे आढळते,असेही ते म्हणाले.
पोलिस खात्यातील २३२ शिपायांना कमांडो प्रशिक्षण देण्यात आले आहे. आता या शिपायांचा वापर फक्त हप्ते गोळा करण्यासाठी, किंवा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो,असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. या सर्व पोलिसांना एकत्रित करून स्वतंत्र कमांडो विभाग स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार डिसोझा म्हणाले. उत्तर व दक्षिण गोव्यासाठी कायमस्वरूपी जलद कृती दलाची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. ९ सप्टेंबर रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा बोध त्यांनी घेतल्यानंतर त्यानंतर अमेरिकेत एकही प्रकार घडला नाही, याचा धडा आता भारतानेही घेण्याची गरज आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments: