Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 6 December 2008

चालतेबोलते 'नाट्यस्कूल' हरपले, जयदेव हट्टंगडी गेले

समांतर रंगभूमीवरील एक बिनीचा शिलेदार हरपला
प्रायोगिक नाटकांचे एक चालतेबोलते 'स्कूल' कायमचे काळाच्या 'पडद्या'आड गेले

नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर थेट व्यावसायिक नाटक किंवा चित्रपटांची वाट चोखाळणारे अनेकजण सापडतील. तथापि, समर्थ नाट्य चळवळ उभी राहावी म्हणून व्यावसायिकतेची, झगमगाटाची दुनिया नाकारून संपूर्णपणे स्वतःचे आयुष्य नाट्यचळवळीला समर्पित केलेले जे मोजके नाट्यकर्मी आहेत त्यांपैकी एक अग्रक्रमाने येणारे नाव म्हणजे कै. जयदेव हट्टंगडी. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून प्रशिक्षित होऊन बाहेर पडल्यापासून ते आजतागायत हट्टंगडी समांतर रंगभूमीच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करतच राहिले. "रंगायन'मधून फुटून निर्माण झालेली "आविष्कार' ही नाट्यसंस्था समांतर रंगभूमीला वाहून घेतलेली एक अग्रगण्य संस्था. जयदेव हट्टंगडी या संस्थेशी गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळ संबंधित होते. आविष्काराचे ते आधारस्तंभ होते."आविष्कार'च्या नाट्य प्रशिक्षण शिबिरांतून अगदी सुरुवातीपासून ते अगदी कालपरवापर्यंत त्यांनी अनेक होतकरू रंगयात्रींना मार्गदर्शन केले. या संस्थेतर्फे त्यांनी "भिंत', "पोस्टर',"मीडीया' यासारख्या अनेक यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन केले. "चांगुणा' या नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाला. "बाकी इतिहास', "वारा भवानी आईचा', "कुत्ते' यासारखी वेगळ्या पठडीतली नाटके त्यांनी दिली.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अब्राहम अल्काझींच्या हाताखाली शिकून मिळवलेल्या अनुभवात स्वतःच्या स्वतंत्र शैलीची व प्रज्ञेची भर घालून हट्टंगडीनी "चांगुणा' हे नाटक बसवले आणि या पहिल्याच नाटकाने मराठी रंगभूमीने या समर्थ दिग्दर्शकाची दखल घेतली. "मीडीया' या दुसऱ्या नाटकाने नाटकाच्या विविध कंगोऱ्यांवरील त्यांच्या जबरदस्त प्रभुत्वावर शिक्कामोर्तब केले. नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, अभिनय या सर्वच बाबतीत "मीडीया' हे नाटक प्रायोगिक मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये जे अल्काझी शिकवायचे ते मराठी रंगभूमीवर रुजविण्याचे काम ज्या दोन दिग्गजांनी केले त्यांपैकी पहिले कमलाकर सोनटक्के, दुसरे जयदेव हट्टंगडी. एक अभिनेता म्हणून अपयशी ठरलेले हट्टंगडी एक दिग्दर्शक म्हणून टिकले पण एक नाट्यप्रशिक्षक म्हणून सर्वांना मानवले.
पाश्चात्त्य रंगभूमी, भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी इत्यादींचं त्याचं वाचन इतके प्रचंड होतं की त्यांची नाट्यशिबीरं म्हणजे नाट्यकर्मींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरत असे. "मला सिन्सियर थिएटर करायचे आहे' हे त्यांचे परवलीचे वाक्य असायचे.
गोवा कला अकादमीची तीन शिबिरे कै. जयदेव हट्टंगडीनी घेतली. दोन मराठी रंगभूमीसाठी व एक तियात्रासाठी. (मूळ मंगलोरी असल्यामुळे ते कोकणीही उत्तम बोलत असत).
दिलीप देशपांडे, दिलीप बोरकर, डी. सतीश, महेश आंगले व डॉ. अजय वैद्य हे गोव्यातील त्यांचे निकटचे स्नेही.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांची यासंदर्भात भेट घेतली असता ते म्हणाले की, नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय इ.बद्दल अतिशय ताकदीने बोलणारा माणूस म्हणजे जयदेव हट्टंगडी. दिवसाचे सलग आठ तास ते एकट्याने शिबिर घेत असत. त्यात ते थिअरी तर शिकवतच; पण जास्त भर असायचा तो प्रात्यक्षिकांवर. त्यामुळे डॉ. वैद्यांच्या मते ते उत्कृष्ट नाट्यशिक्षक तर होतेच पण त्याहीपेक्षा नाट्यप्रशिक्षक म्हणून ते मोठे होते. अतिशय शिस्तप्रिय, वक्तशीर व शिबिरापुरते तापट असा त्यांचा खाक्या होता. नाटकाचा अचूक आकृतिबंध व सक्षम पात्रचित्रण ही त्यांची बलस्थानं होती. नेहमी परिपूर्णतेकडेे त्यांचा कटाक्ष असायचा. संवाद उच्चारताना भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत ते कधीच तडजोड करत नसत.
डॉ. वैद्य म्हणाले, की नाटक करताना आव्हान स्वीकारणे हा जयदेव हट्टंगडींचा धर्मच होता; अखेरच्या दिवसांत आतड्याच्या कर्करोगाशी झगडतानाही त्यांनी मृत्यूचे आव्हान स्वीकारलेलेच होते.

No comments: