Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 3 December 2008

'तुलपन'ला सुवर्ण मयूर, 'इफ्फी'चा थाटात समारोप

- सर्वोत्तम होतकरू दिग्दर्शकाचा रौप्य मयूर सर्जी दोस्तेवोए यांना
- खास परीक्षकांचा रौप्य मयूर श्रीलंकेच्या मालिनी फोन्सेकांना

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): ३९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात कझाकस्तान-जर्मनीच्या "तुलपन' या चित्रपटाने पहिले दोन पुरस्कार पटकावून विक्रम केला. यंदाचा उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयूर व उत्कृष्ट होतकरू दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयूर पुरस्कार या चित्रपटाचे दिग्दर्शक व पटकथाकार सर्जी दोत्सेवोए यांनी पटकावला. स्पर्धात्मक विभागासाठी असलेला खास परीक्षकांचा रौप्यमयूर पुरस्कार "आकाश कुसुम' या श्रीलंकन चित्रपटाच्या अभिनेत्री मालिनी फोन्सेका यांना घोषित करण्यात आला.
गेल्या २२ नोव्हेंबर रोजी धडाक्यात उद्घाटन झालेल्या या महोत्सवाची सांगता आज कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात झाली. यावेळी नामांकित अभिनेते, दिग्दर्शक कमल हसन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत, केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे संयुक्त सचिव व्ही. बी. प्यारेलाल, चित्रपट महोत्सव संचालक एस. एम. खान, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, अभिनेते कबीर बेदी, सुरेश ओबेरॉय, प्रसिद्ध अमेरिकी दिग्दर्शक जॉल लेंडीस यांचीही उपस्थिती होती. यावेळी स्पर्धात्मक विभागाच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष पीटर चॅन यांनी पुरस्कारांची घोषणा केली. परीक्षक मंडळाचे इतर सदस्य मार्को म्युलर,निकी करीमी व लाव दियाझ यावेळी खास उपस्थित होते.परीक्षक मंडळाच्या भारतीय सदस्य अभिनेत्री तबस्सुम हश्मी खान (तब्बू) ची तब्बेत बिघडल्याने ती गैरहजर राहिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
व्ही.बी.प्यारेलाल यांनी यंदाच्या महोत्सवाला मिळालेल्या जोमदार प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले. या महोत्सवाला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रतिनिधींची ८० ते १०० टक्के उपस्थिती होती, यावरूच हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी ठरल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोवा हे कायमस्वरूपी ठिकाण असल्याचे ठणकावून सांगितले. चित्रपट महोत्सवासाठी गोवा हेच योग्य ठिकाण असल्याचा पुरस्कार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गोव्याच्या "अंतनार्द' या चित्रपटाला गेल्यावेळी पाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले यावरून गोव्यात चित्रपट संस्कृती नसल्याचे निमित्त पुढे करणाऱ्यांना चांगलीच चपराक असल्याचेही श्री.कामत म्हणाले. पणजी प्रमाणे मडगाव येथील रवींद्र भवन आवारात "आयनॉक्स' सिनेमागृह उभारले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. सध्याच्या मडगावातील रवींद्र भवनात दक्षिण गोव्यातील चित्रपट व्यावसायिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,असे आश्वासनही मुख्यमंत्री कामत यांनी दिले. "फिल्म सिटी',"फिल्म कॉलेज' व इतर अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महोत्सव संचालक एस. एम. खान, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव व सरव्यवस्थापक निखिल देसाई यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.
चित्रपट महोत्सवाचे संचालक एस.एम.खान यांनी सुरुवातीला मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला व या हल्ल्यात शहीद झालेले जवान व बळी गेलेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली. या हल्ल्यांत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. महोत्सवाच्या आयोजनाबाबत श्री.खान यांनी समाधान व्यक्त केले. एकूण ४४ देशांतील १८५ चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आले. सुमारे ६ हजार प्रतिनिधींनी या महोत्सवाचा लाभ घेतला. यंदा फिल्म बाजारालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगून हा महोत्सव खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.
"इफ्फी' निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची रक्कम यंदा वाढवण्यात आल्याने जगात कुठल्याही चित्रपट महोत्सवातील सर्वाधिक रक्कम यावेळी देण्यात आल्याचे श्री.खान यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुवर्ण मयूर पुरस्काराची रक्कम १० लाखांवरून ४० लाख रुपये करण्यात आली आहे, तर रौप्य मयूर विजेत्यांना प्रत्येक अडीच लाखांच्या बदल्यात यंदापासून प्रत्येकी १५ लाख रुपये देण्यात आले आहेत.
यावेळी मुख्यमंत्री कामत व महापौर टोनी रॉड्रिगीस यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. समारोप कार्यक्रमावेळी प्रत्यक्ष व्यासपीठावरील थोडा गोंधळ सोडल्यास व प्रत्यक्ष विजेत्यांची नावे घोषित करताना झालेली घाई सोडल्यास हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पडला. समारोप सोहळ्यानंतर दिग्दर्शक मजिद मजिदी यांचा इराणी चित्रपट "द सॉग ऑफ स्पॅरोज' चे प्रदर्शन करण्यात आले. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन सिमॉन सिंग यांनी केले.
------------------------------------------------------
कमल हसनलाही गोवा भावला...
"इफ्फी' च्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाषण करताना अभिनेत्री रेखा यांनी भविष्यात गोव्यात राहणार असल्याचे सांगितले होते; तर समारोप सोहळ्यावेळी अभिनेता कमल हसन यांनीही आपल्याला गोव्यात राहणे आवडेल,अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गोव्यात प्रत्येक वेळी आल्यानंतर येथील गोड स्मृती घेऊन आपण परततो. गोव्यात आपण अनेकदा येतो. आपण गोव्याचेच आहात काय,असा सवाल केला जातो तेव्हा आपण होय,असे उत्तर दिले आहे व नंतर त्याचा खुलासाही केला आहे. यापुढे गोव्यात यायला व राहायला आपल्याला नक्कीच आवडेल,असेही त्यांनी सांगितले. चित्रपट हेच आपले जीवन असल्याचे ते म्हणाले, त्यामुळे हा महोत्सव आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

No comments: