पणजी, दि.१ (प्रतिनिधी) - मुंबई येथील ताज हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात "हाय ऍलर्ट' जारी करण्यात आल्याने येत्या ३ रोजी जुने गोवे येथे होणाऱ्या "गोंयच्या सायबाच्या फेस्ता'त सुरक्षेची मोठी जबाबदारी गोवा पोलिस खात्यावर आली आहे. हजारो भाविकांची या उत्सवाला गर्दी लोटत असते व त्यातच या उत्सवाला पर्यटनाचेही महत्त्व असल्याने विदेशी लोकांचीही मोठी उपस्थिती असते. त्यामुळे सुरक्षेची तयारी करणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची सध्या तारेवरील कसरत सुरू आहे.
उद्या २ रोजी "इफ्फी'चा समारोप होत असल्याने त्यासाठीची सर्व सुरक्षा यंत्रणा "फेस्ता'साठी वापरण्यात येणार आहे. पाळी पोटनिवडणूक व "इफ्फी' निमित्ताने बोलावण्यात आलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या दोन कंपन्या राज्यात असून त्या सर्वांना जुने गोवे येथे तैनात करण्यात येतील. गोवा राखीव पोलिस दल, गोवा सशस्त्र पोलिस दल तसेच जलद कृती दलाचे पोलिसही या सुरक्षा यंत्रणेचा भाग असतील. ठिकठिकाणी पोलिस व वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून संपर्काची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या उत्सवासाठी उद्यापासूनच गोव्याबाहेरून हजारो लोकांचे आगमन होण्यास सुरुवात होणार असल्याने उद्या सकाळपासूनच पोलिसांना त्यांच्या जागा देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी दिली. ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. काही पोलिस खाजगी वेशातही तैनात करण्यात आले असून कुणीही संशयितरीत्या फिरताना आढळल्यास त्याला लगेच ताब्यात घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन सेवेसाठी "१०८' रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहनेही सज्ज करण्यात आली आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅनेऱ्यांची सोय करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पार्किंग व्यवस्थेची वेगळी सोय
उद्या २ व ३ रोजी याठिकाणी पार्किंगसाठी वेगळी सोय करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.पणजीहून आलेल्या कार व दुचाकी बाकीया यांच्या जमिनीत पार्क करण्यात येतील. नेवरामार्गे मडगाव व वास्को येथून येणारी वाहने एला फार्म व पशुसंवर्धन मैदानावर पार्क करण्यात येतील. फोंडामार्गे येणारी कार व दुचाकी यांच्यासाठी पिंटो गॅरेज जवळील जागेत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.विविध धर्मगुरूंच्या वाहनांसाठी बॉम जीझस बॅसिलिका चर्चच्या कुंपणात सोय असेल. अतिमहनीय व्यक्ती किंवा अपंगासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत सोय करण्यात आली आहे. दरम्यान,या उत्सवामुळे सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात गैरसोय सहन करावी लागणार असल्याने त्यांनी पोलिस व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिकांत नाराजी
पोलिस खात्याकडून सुरक्षेबाबत ग्वाही देण्यात येत असली तरी जुने गोवे भागातील जनतेत मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मबंईत घडलेल्या प्रकाराची व्याप्ती पाहिल्यास तेथे पुरवण्यात आलेली सुरक्षा ही केवळ नाममात्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. फेस्तासाठी प्रचंड गर्दी लोटत असल्याने व चालणेही कठीण बनत असल्याने अशावेळी ही सुरक्षा कितपत पुरेशी आहे,याबाबत मात्र जनतेच्या मनातच संभ्रम निर्माण झाला आहे.
Tuesday, 2 December 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment