लेह/श्रीनगर, द. ९
गेेले वर्षभर शांत राहिल्यानंतर २०१० हे वर्ष सरतासरता चिनी लष्कराने आग्नेय लद्दाख भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करून त्याठिकाणी प्रवासी थांबा उभारत असलेल्या ठेकेदाराला धमकावून जबरदस्ती काम थांबविण्यास भाग पाडल्याचे वृत्त आहे.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या मोटारसायकलवर आलेल्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या धेमचोक प्रांतातील गोंबिर भागातील भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने मंजूर केल्याप्रमाणे प्रवासी निवारा उभारण्याचे काम करत असलेल्या मजुरांना धमकावले, असे वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. लेह जिल्ह्याच्या मुख्यालयापासून आग्नेय दिशेला ३०० किमी अंतरावर असलेल्या गावात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. नागरी प्रशासन, लष्कर, केंद्रीय सुरक्षा संस्था आणि इंडो-तिबेटीयन पोलिसांच्या संयुक्त बैठकीत या गंभीर घटनेबाबत एक अधिकृत अहवाल तयार करण्यात आला.
गृहमंत्रालयाच्या सीमावर्ती विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे दोन लाख रुपये खर्च करून गोंबिर गावातील ‘टी’ पॉईंटवर हा प्रवासी निवारा उभारण्यात येत होता. चिनी लष्कराच्या जवानांनी याठिकाणी येऊन निवार्याचे काम थांबविले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चिनी लष्कराच्या जवानांना बघताच मजुरांमध्ये अस्वस्थता पसरली आणि ते ताबडतोब मदतीसाठी भारतीय लष्कराच्या चौकीकडे धावले होते, असे एका वरिष्ठ अधिकार्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. यावेळी चिनी जवानांनी काही घोषणाही दिल्या. परंतु, ते नेमके काय म्हणाले हे समजून घेता आले नाही.
भारतीय लष्कराने या घटनेची त्वरित दखल घेतली आणि परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या ५० किमी अंतरापर्यंत कुठलेही कार्य हाती घेताना लष्कराकडून त्याची परवानगी घेतल्याशिवाय कार्य सुरू करू नये, असे निर्देश लष्करातर्ङ्गे देण्यात आले आहेत. लेहस्थित १४ व्या कॉर्पचे अधिकृत प्रवक्ते लेफ्ट. कर्नल जे. एस. ब्रार यांनी या घटनेबाबत कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.
Monday, 10 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment