पणजी, दि. ७ (विशेष प्रतिनिधी) - गोव्यातील राजकीय अस्थिरता पाहाता, विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता बरीच वाढली असून, काही ज्येष्ठ सरकारी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक घेण्याची तयारी वरिष्ठ पातळीवर सुरू झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी यासंबंधात काही अधिकार्यांना सूचना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
निवडणूक काळात कोणते पोलिस अधिकारी कुठे असले तर ते कॉंग्रेसला हितकारक ठरू शकेल, याची चाचपणी सध्या केली जात आहे. अशा नियुक्त्या तातडीने करण्याबाबत सध्या ज्येष्ठ पोलिस अधिकार्यांशी सल्लामसलत केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मतदारयाद्यांना अंतिम स्वरूप दिले गेले असल्याने निवडणूक आयोग कधीही निवडणुका घ्यायला तयार असल्याचे सांगितले जात आहे.
मिकी पाशेको यांना मंत्रिपद देण्याबाबत निर्माण झालेल्या पेचावर तोडगा म्हणून तसेच सरकारच्या निष्क्रियतेमुळे जनतेमध्ये पसरत चाललेला असंतोष अधिक तीव्र होण्यापूर्वी निवडणुका घ्याव्यात, असा सूर सत्ताधारी आघाडीत व्यक्त केला जात आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यालयांवर अलीकडे पडलेले छापे हे अन्य असंतुष्ट आमदारांना इशारे मानले जातात. प्रादेशिक आराखड्यावरून पुन्हा एकदा राज्यात आंदोलन सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी पोलिस यंत्रणा पोखरल्याचे उघड
झाले आहे. या पार्श्वभूमीवर जनतेमधील असंतोष भडकण्यापूर्वी निवडणुका न घेतल्यास कॉंग्रेस पक्ष भुईसपाट होईल, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केल्याने उच्च पातळीवर मुदतपूर्व निवडणुका घेण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. मिकी यांच्यामागोमाग आता ऍड. दयानंद नार्वेकर यांनीही कॉंग्रेसवर उघड टीका सुरू केल्याने विशेषतः त्यांनी आरोग्यमंत्र्यांवर थेट टीका केल्याने कॉंग्रेसमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. यावर तोडगा म्हणून तातडीने निवडणुका घेऊन या नेत्यांना त्यात गुंतवून ठेवण्याची चाल कॉंग्रेस पक्ष खेळेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
Sunday, 9 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment