Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 13 January 2011

पोलिस हवालदार अरुण देसाई निलंबित

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी): बेळगाव पोलिसांनी काल लोंढा येथे जप्त केलेल्या २६ लाखांच्या हशीश प्रकरणात अटक करण्यात आलेला मडगाव पोलिस स्थानकावरील हवालदार अरुण नागप्पा देसाई याला आज दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी निलंबित केले व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांची नियुक्ती केली. बेळगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अमली द्रव्य विक्रीचा गुन्हा नोंदविला आहे.
आज बुधवारी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना डीसा यांनी सांगितले की अरुण देसाई हा येथील पोलिस कँटीनचा इनचार्ज होता; त्या पूर्वी तो जिल्हाधिकार्‍यांचा सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. नंतर त्याची बदली मडगाव पोलिस स्थानकावर झाली होती. डीसा यांनी या एकंदर प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त केली व पोलिस खात्याला काळिमा फासणारा हा प्रकार असल्याचे मान्य केले.
बेळगाव पोलिसांकडून या संदर्भात आलेल्या अहवालानंतर अरुण देसाई याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची त्वरित अंमलबजावणी केली गेली. महेश गावकर यांना प्राथमिक चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती डीसा यांनी यावेळी दिली.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरुण देसाई हा पोलिस सेवेत असताना पूर्वीपासूनच फावल्या वेळेत मोटरसायकल भाडी मारत होता व त्यातून नंतर त्याने मोटारही घेतली होती. त्यानंतर त्याने त्या मोटारीतून भाडी मारणे सुरू केले होते. काल त्याच व्हॅनमधून चार नेपाळींना घेऊन जात असताना बेळगाव पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देसाई हा बेळगाव नजीकचाच रहिवासी असून हल्लीच्या काळात त्याने तेथे प्रचंड प्रमाणात शेती व उसाचे मळे फुलविले होते व त्याच्या या गुंतवणुकीकडे सगळेच संशयाने पाहत होते. काल त्याला हशीश प्रकरणात अटक झाल्यावर त्याच्या या गुंतवणुकीचे इंगित सर्वांना कळून चुकले. मात्र सेवा निवृत्तीस अवघीच वर्षे उरलेली असताना त्याला गजाआड जावे लागले.
गोवा पोलिस व अमली पदार्थ तस्कर यांच्यातील अभद्र संबंधांतून पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलरचे अमली द्रव्य विक्री प्रकरण गाजत असतानाच अशा विक्री प्रकरणात अरुण देसाईला अटक झाली असल्याने पोलिस खात्याची उरलीसुरली अब्रूही वेशीवर टांगली गेली आहे. त्याचबरोबर या व्यवसायाची पाळेमुळे थेट कर्नाटकापर्यंत पोहोचल्याचेही सिद्ध झाले आहे.
कर्नाटक पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला पूर्वीपासूनच अरुण देसाई याच्यावर संशय होता. त्या विभागाच्या अधीक्षकपदी नव्याने आलेल्या संदीप पाटील यांनी हा सापळा रचला व त्यात अरुण देसाई व त्याचे चौघे साथीदार अलगद सापडले. त्याची मारुती व्हॅन (जीए ०२-एस-२४१९) जप्त करण्यात आली आहे व पाच मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत.

No comments: