पणजी, दि. १० : एका इमारत बांधकाम व्यावसायिकाच्या ‘करामती’मुळे राजधानी पणजी तब्बल तीन तास अंधारात राहिल्याने लोकांची प्रचंड तारांबळ उडाली. संध्याकाळी ७ ते रात्री दहा या वेळेत हा सावळागोंधळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाटो पणजी येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी खोदाई सुरू असताना भूमिगत वीजवाहिनीलाच दणका बसला. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला. हा नेमका काय प्रकार घडला हेच वीज खात्याच्या अभियंत्यांना कळले नाही. तांत्रिक दोष शोधण्यातच त्यांचा बहुतांश वेळ वाया गेला. संबंधित बांधकाम व्यावसायिकानेही यासंदर्भात गुप्तता पाळल्याचे कळते. अखेर जेव्हा तांत्रिक दोष सापडला तेव्हा वीज खात्याने हालचाली करून रात्री दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.
दरम्यानच्या काळात लोक सातत्याने वीज खात्याशी संपर्क साधून चौकशी करत होते. तथापि, वीज खात्याकडून नेमका खुलासा केला जात नव्हता. रात्री साडेनऊच्या सुमारास असे सांगण्यात आले की, आणखी पंधरा ते वीस मिनिटांत वीज सुरळीत होईल. त्यानंतर पुन्हा काही काळ वीज खंडित झाली. सुदैवाने सध्या थंडीचे दिवस असल्याने लोकांनी कसाबसा हा त्रास सहन केला. आता त्या बांधकाम व्यावसायिकाबद्दल काय, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
Tuesday, 11 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment