Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 12 January 2011

..हा ‘अनाकलनीय प्रामाणिकपणा’!

भाजपकडून पंतप्रधानांवर शरसंधान
नवी दिल्ली, दि. ११ : ‘‘लोक म्हणतात की, मनमोहनसिंग हे व्यक्ती म्हणून अतिशय प्रामाणिक आहेत; परंतु, ते १९४७पासूनच्या देशाच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकारचे नेतृत्व करत आहेत हा ‘अनाकलनीय प्रामाणिकपणा’ आहे’’, असा टोला राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी लगावला.
कॉंग्रेसप्रणित सत्ताधारी संपुआ सरकारवर विरोधी भाजपकडून सुरू असलेली टीकेची धार आज अधिकच वाढली.स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ‘सर्वांत भ्रष्ट’ सरकारचे नेतृत्व डॉ. मनमोहनसिंग करत असून या सरकारकडे देशात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या विविध समस्यांवर कसा तोडगा काढावा याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.
संपुआ सरकार देशाची सर्वच बाबतीत दिशाभूल करत आहे. भाजपने पी. जे. थॉमस यांच्या दक्षता खात्याच्या आयुक्तपदी नियुक्तीला जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र कॉंग्रेसने तरीही त्यांची त्या पदी नियुक्ती केली. आता हीच नियुक्ती त्यांच्या घशात अडकलेले हाड बनली आहे. थॉमस पायउतार झाले तर सरकारची थोडी अब्रू वाचणार आहे; अन्यथा पंतप्रधान देशात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत, असाच त्याचा अर्थ होईल, असा युक्तिवाद जेटली यांनी केला.
यावेळी बोफोर्स संदर्भात झालेला भ्रष्टाचार, २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आदींवरूनही जेटली यांनी कॉंग्रेसवर जोरदार तोफ डागली. बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरणाचे सर्व धागेदोरे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दाराशीच जाऊन थांबत आहेत. तेव्हा झालेला २४ वर्षांचा करार अजूनही कॉंग्रेस नेत्यांची पाठ सोडायला तयार नाही याचे कारण देशाच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण आहे की ज्याची नाळ थेट पंतप्रधानांशी जोडली गेली आहे, असे जेटली म्हणाले. अल्पवयीन रुचिका आणि आरुषी यांना सीबीआय न्याय मिळवून देऊ शकली नाही याचे कारण त्यांची सर्व शक्ती सरकारकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरली जात होती, असा घणाघाती आरोपही जेटली यांनी केला.
देशात सध्या अनेक समस्यांनी सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. नक्षलवाद, महागाई, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अशा अनेक प्रश्‍नांनी जनतेला वेठीस धरले आहे. मात्र या समस्यांवर मात करण्यासाठी कॉंग्रेस सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. कांदा आणि टोमॅटो यांचे दर कमी होत नाहीत. स्वतः अर्थतज्ज्ञ असलेल्या भारताच्या विद्यमान पंतप्रधानांना गेली तीन वर्षे यावर तोडगा काढता येऊ नये, ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका जेटली यांनी केली.
जेव्हा तुम्ही रंगांचा विचार कराल तेव्हा आमचा विचार करा, असे एका जाहिरातीचे घोषवाक्य आहे; त्याच धर्तीवर ‘जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा विचार कराल तेव्हा आमचाच विचार करा’, असे कॉंग्रेसचे घोषवाक्य बनले आहे, असा सणसणीत टोलाही जेटली यांनी शेवटी लगावला.

No comments: