Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 12 January 2011

सिप्रियानो मृत्युप्रकरण पणजी पोलिसांवर शेकणार

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): मयडे - म्हापसा येथील सिप्रियानो फर्नांडिस याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण पणजी पोलिसांवर शेकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सिप्रियानो याला मारहाण करण्यात सामील असलेल्या दोन पोलिसांसह पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांना निलंबित करण्याची मागणी आज ‘उठ गोयकारा’ या संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयीन चौकशीचे आदेश न दिल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे या संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. जतीन नाईक यांनी सांगितले. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सिप्रियानो याच्या विरोधात तक्रार करणारी महिला तसेच सिप्रियानोचे चुलत भाऊ उपस्थित होते.
‘सिप्रियानोला पणजी पोलिसांनी मरेपर्यंत मारहाण केली. माझ्या डोळ्यांदेखत त्याला पोलिस वाहनातच बडवण्यात आले. जुन्या सचिवालयाजवळ आम्ही पोहोचेपर्यंत तो अर्धमेला झाला होता. पोलिस स्थानकात तर त्याला धड चालताही येत नव्हते. त्यानंतरही त्याला फरफटत ओढून आत नेण्यात आले व पुन्हा मारहाण करण्यात आली. मला पोलिस स्थानकात बाहेर असलेल्या प्रतीक्षा कक्षात बसवून ठेवण्यात आले. आतमध्ये त्याला फटके मारण्यात येत असल्याचा आवाज मी बाहेर बसून ऐकत होते’’, अशी सनसनाटी माहिती मयत सिप्रियानो याच्या विरुद्ध पोलिस तक्रार करणार्‍या महिलेने यावेळी पत्रकार परिषदेत दिली. सिप्रियानो याला मारहाण करण्यासाठी आपण पोलिस तक्रार केली नव्हती तर तो आपल्या घरी येऊन शिवीगाळ करीत असल्याने त्याला तेथून हाकलण्यासाठी आणि समज देण्यासाठीच ही तक्रार आपण नोंदवली होती, असेही सदर महिलेने सांगितले. सदर तक्रारदार महिला ही सिप्रियानोची मैत्रीण असून त्यांनी काही महिने विदेशात एकाच जहाजावर कामही केले होते. ‘‘पोलिसांनी ज्यावेळी मला दूरध्वनी करून सिप्रियानोच्या निधनाची माहिती दिली तेव्हा मी थक्कच झाले’’, असेही तिने सांगितले. आपले नाव मात्र प्रसिद्ध न करण्याची गळ तिने पत्रकारांना घातली.
पोलिसांनी सिप्रियानो याला अटक केल्याची कोणतीच माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली नाही, असा दावा त्याचा चुलत भाऊ कॉस्मी फर्नांडिस यांनी यावेळी केला. ज्यावेळी आम्ही जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थित सिप्रियानो याचा मृतदेह पाहण्यासाठी गोमेकॉत गेलो त्यावेळी त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. त्याचे तोंडही सुजलेले होते. त्याच्या गुप्त भागावरही सूज दिसत होती व एका हाताच्या नखातून रक्त आले होते. मनगटालाही सूज आल्याचे आम्हांला आढळून आले, असेही कॉस्मी फर्नांडिस यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे पणजी पोलिस विलक्षण अडचणीत सापडले आहेत. तसेच, आरोपीला पकडण्यासाठी पोलिस तक्रारदारालाच रात्रीच्या वेळी पोलिस वाहनात घेऊन जात असल्याच्या प्रकारावरही प्रश्‍न निर्माण झाला आहे.सिप्रियानो याचा पोलिस कोठडीत मृत्यू झालाच नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. या विषयीचा अधिक तपास उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये करीत असल्याची माहिती आज पोलिस प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
मात्र, आज सायंकाळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, विभागीय उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांना पोलिस महासंचालकांनी तातडीने बोलावून घेतल्याने हे प्रकरण बरेच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------------------
उठ गोयकारा संघटनेचा दावा
- अटक केल्यानंतर सिप्रियानोची २४ तासांत वैद्यकीय चाचणी केली नाही.
- नियमांना फाटा देत न्यायाधीशांसमोर हजर केले नाही.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटक केल्याची माहिती २४ तासांत त्याच्या नातेवाइकांना देणे बंधनकारक आहे. त्याला फाटा देत पोलिसांनी सिप्रियानोच्या नातेवाइकांना कोणतीही माहिती दिली नाही.

No comments: