पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - भारत स्वतंत्र झाला असला तरी, हा देश धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अद्याप गुलाम आहे. त्यासाठीच रामजन्मभूमीवरच श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण होणार आहे. तेव्हाच या देशातील हिंदू मान वर करून जगतील. अयोध्येतील त्या संपूर्ण भूखंडावर प्रभू रामचंद्राचेच मंदिर उभारले जाणार आहे. बाबरी मशीद अयोध्येतच नव्हे तर संपूर्ण भारतात कुठहीे उभारायला देणार नसल्याचे प्रतिपादन करीत मंदिर उभारणीचे रणशिंग आज विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आशोकजी सिंघल यांनी फुंकले.
‘राम मंदिर हे दान आणि दयेने नको, ते हिंदूंच्या मनगटाच्या बळावर उभारले जाईल. भव्य मंदिर हेच सर्व जिहादी विचारांना सडेतोड उत्तर असेल’ असे वक्तव्य डॉ. प्रवीण तोगाडीया यांनी यावेळी केले. तर, ‘हनुमत शक्ती जागृत करून एकाही मंदिरात मूर्तिभंजन होणार नाही याची जबाबदारी घेऊया, असे प. पू ब्रम्हेशानंद स्वामी यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून सांगितले.
विहिंपचे ज्येष्ठ नेते आज फर्मागूडी फोंडा येथील मैदानावर परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर श्री हनुमत शक्ती जागरण मंचाच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगाडीया, तपोभूमी पीठाचे ब्रम्हेशानंद स्वामी, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. वेतांत्मजी, दिनेशचंद्रजी (महामंत्री संघटन), देवकीनंदन जिंदाल, मधुकरराव दीक्षित (सहसेवा प्रमुख), दीपक गायकवाड (कोकणप्रांत सहमंत्री), सुभाष भास्कर वेलिंगकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोवा विभागप्रमुख), अवधूत कामत (गोवा विभाग सहकार्यवाह) व शिवोलीचे मुकूंदराज महाराज उपस्थित होते. या विशाल मेळाव्याला हजारोंच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.
मंदिर उभारणीचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव हे पक्के हिंदू होते, अन्यथा वादग्रस्त ‘ढाचा’ पाडून मंदिर निर्माणाचे काम सुरू झाले नसते. त्यावेळचे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील कल्याणसिंग यांच्या सरकारांची उत्तम युती झाल्यानेच संपूर्ण ‘ढाचा’ खाली आला, असे श्री. सिंघल यांनी सांगितले.
अयोध्येतील वादग्रस्त जागेत उत्खननावेळी मंदिराचे अवशेष आढळून आल्यास ती संपूर्ण जागा हिंदूंच्या ताब्यात दिली जाईल, असे शपथपत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. त्या शपथपत्राची पूर्तता केंद्र सरकारने करावी, अन्यथा संपूर्ण भारतात आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भारतातील आणि पाकिस्तानातील अनेक मुस्लिमाना शांती पाहिजे आहे. मात्र त्यांचे आज या समाजात काहीही स्थान नाही. कारण इस्लाम धर्म आज जिहादी लोकांनी हातात घेतला असल्याचा दावा त्यांनी केला. ‘पोप’चे कार्य पूर्ण करण्यासाठी एक महिला भारतात आली असल्याचे सांगत ओरिसात वनवासी लोकांमध्ये काम करणार्या लक्ष्मणानंद स्वामींना मारण्यासाठी ख्रिश्चन चर्चने बैठक घेऊन ही हत्या केली असल्याचा दावा यावेळी श्री. सिंघल यांनी केला. ज्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्या बैठकीचा इतिवृत्तात आणि कोणी कोणी त्यावर सही केली आहे हे आपण पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, भारतापेक्षा सहनशील देश अन्य कुठेच नाही. या लोकांना हिंदू धर्माची आणि साधुसंतांची भिती वाटायला लागली असल्यानेच हिंदू दहशतवादाचे तुणतुणे वाजवत आहेत, असेही ते म्हणाले. राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले प.पू ब्रम्हानंद स्वामींची यावेळी श्री. सिंघल यांनी आठवण काढून त्यांच्या आंदोलनाच्या सहभागाची माहिती दिली.
‘आजही हिंदू मंदिरातील धन लुटण्यासाठी मंदिरातील मूर्तीभंजन आणि चोर्या केल्या जात आहेत. बाबर हा आक्रमक आणि लुटारू होता. अयोध्येतील राम मंदिर हे बाबरने तोफेद्वारे पाडले होते. बाबरच्या बाजूने उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती हा या देशाचा शत्रू आहे’, असे मत प्रवीण तोगाडीया यांनी यावेळी व्यक्त केले. एकही हिंदूला दहशतवादी कारवाईसाठी शिक्षा झालेली नाही, त्यामुळे हिंदू धर्माला बदनाम करू नये. उत्तर प्रदेश येथील पांडे बंधू या कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी विमान अपहरण केले होते. त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसही ‘हाईजॅकर’ची पार्टी आहे असे आम्ही म्हणू शकतो का, असा सवाल श्री. तोगाडिया यांनी यावेळी उपस्थित केला.
‘राम मंदिर नको असलेल्या लोकांना ‘हेऽऽऽ... राऽऽऽम’ म्हणण्यास भाग पाडले पाहिजे, असे पू. ब्रम्हेशानंद स्वामिना उपस्थितांना सांगितले. भव्य मंदिराची उभारणी होत नाही तोवर कोणीही शांत बसू नये.आमच्या जिव्हारी येईल तोवर थांबणे योग्य नाही, असेही ब्रम्हेशानंद स्वामी म्हणाले. आपण ज्या मंदिरात जाऊन वाकतो त्या मंदिरातील मूर्तींचेे भंजन होत आहे हे लज्जास्पद आहे. सुरक्षा आपण तयार केली पाहिजे म्हणून सरकार सांगते. राजकीय लोकांना केवळ आमच्या मतांचीच गरज आहे. आमच्या अध्यात्माच्या मतांची त्यांना गरज नाही. आध्यात्मिक वृत्ती पायाखाली घालून आम्हाला मतीभ्रष्ट करून टाकले आहे. या सरकारला सर्व मंदिराला सुरक्षा देण्यास भाग पाडले पाहिजे, असे स्वामी पुढे म्हणाले.
‘कॉंग्रेसने हा गोवा बार, बारबाला आणि कॅसिनो भरून टाकला आहे. कार्निव्हल, कॅसिनो आणि ड्रग्स माफियांची भूमी केली आहे. येथे प्रशासन नाही, सुरक्षा नाही. केवळ पैसे खाण्यातच दंग आहेत. त्यामुळे हिंदू जीवनमूल्ये पुन्हा सक्रिय केली पाहिजेत’ असे मत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले. शहराला दिलेले वास्को दगामा हे एका लुटारूचे नाव आहे. या वर्षभरात पोर्तुगीज नावे बदलण्याची शपथ घेतली पाहिजे, असे श्री. वेलिंगकर म्हणाले. सध्या गोव्यात विकृत पोर्तुजीगधार्जीणेपणाला उधाण आले आहे. त्याला येथील सरकार समर्थन देत आहे. नुकत्याच आलेल्या ‘‘सांग्रेस’’ या पोर्तुगीज जहाजावर जाणारा खासदार फ्रान्सिस सार्दिन हे गद्दार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोतीडोंगर येथे ट्रकात सापडलेल्या तलवार प्रकरणात अद्याप आरोपपत्र सादर होत नाही. विजापूर, हुबळी, पाकव्यक्त काश्मीर येथून येणारे मुस्लिम बेकायदेशीर दर्गे उभारत आहे. याच बेकायदेशीर दर्ग्यावरून सावर्डे येथे दंगल उसळली होती, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
जाहीर महासभेचे सूत्रसंचालन राजू वेलिंगकर यांनी केले तर, आभार आनंद शिरोडकर यांनी व्यक्त केले. पसायदानाने सभेचा समारोप करण्यात आला.
Monday, 10 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment