पणजी, दि. १३(प्रतिनिधी)
राज्य सरकारकडून अनुसूचित जमातीची घोर उपेक्षा सुरू आहे. अनुसूचित जमाती कल्याण खाते व अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबत सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरल्याने आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या समाजाच्या नेत्यांनी घेतला आहे. ‘युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशन’ (उटा)तर्फे सरकारच्या या बेफिकीर वृत्तीचा निषेध करण्यात आला असून उद्या १४ रोजी धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारने ‘एसटी’ समाजाची फसवणूक चालवली आहे. केंद्र सरकारने आदेश देऊनही अद्याप ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते कार्यरत करणे राज्य सरकारला जमत नाही यावरून सरकारची या समाजाप्रति असलेली असंवेदनशील वृत्तीच दिसून येते, अशी प्रतिक्रिया संघटनेचे निमंत्रक माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केली. यापूर्वी एकदा विधानसभेवर मोर्चा आणून संघटनेने आपली ताकद दाखवली होती. सरकारने त्यावेळी दिलेले लेखी आश्वासन पूर्ण केले नाही. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला असता मुख्यमंत्री कामत यांनी ‘उटा’च्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करून नव्याने आश्वासन दिले होते. पण ते देखील हवेतच विरले. आता मात्र भूमिपुत्रांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून या सरकारला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते हे यावरून स्पष्ट झाल्याचे श्री. वेळीप म्हणाले.
सांतइनेज येथील एका सरकारी वसाहतीच्या खोलीत ‘एसटी’ कल्याण खात उघडण्यात आले आहे. अत्यंत अडगळीच्या या जागेत एका खोलीबाहेर नुसता फलक लावला म्हणजे खाते सुरू झाले, असे भासवून सरकार भूमिपुत्रांना मूर्ख बनवते आहे काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सरकारच्या या बेपर्वा वृत्तीविरोधात या समाजात प्रचंड असंतोष पसरला असून पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी उद्या १४ रोजी संघटनेचे काही निवडक पदाधिकारी राजधानीत धरणे धरणार आहेत. हे धरणे धरूनही सरकारला जाग येत नसेल तर मात्र राज्यातील संपूर्ण समाजच रस्त्यावर उतरेल हे सरकारने ओळखून असावे, असा इशाराही यावेळी श्री. वेळीप यांनी दिला. गोवा आपल्या मुक्तीचा सुवर्णवर्षी महोत्सव साजरा करीत असताना इथल्या भूमिपुत्रांवरच असा अन्याय होत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले. विविध सरकारी खात्यांत मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू आहे; पण या समाजासाठी राखीव असलेला अनुशेष मात्र अजूनही भरला जात नाही. केवळ राजकीय भाषणांतून या समाजाचा उदोउदो करणार्या सरकारच्या पोकळ घोषणांमागील कारस्थान समाजाच्या चांगल्याच लक्षात आले आहे व त्यामुळे यापुढे या समाजाला मूर्ख समजणार्यांनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार जाणीवपूर्वक या समाजाची गळचेपी करीत असून त्यामुळे निर्माण होणार्या उद्रेकाला पूर्णतः सरकार जबाबदार ठरेल, असेही यावेळी श्री. वेळीप यांनी बजावले आहे.
Friday, 14 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment