पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
ड्रग माफिया ‘दुदू’ याची बहीण ‘आयाला’ व प्रेयसी ‘झरिना’ कशा पद्धतीने गोव्यात ड्रग व्यवसायात गुंतलेल्या आहेत, याचा भांडाफोड झाला असून दुदू आणि अन्य ड्रग डिलरबरोबर झोडत असलेल्या पार्टीची छायाचित्रे हाती लागली आहेत.
हणजूण येथे दुदू राहत असलेल्या भाड्याच्या घरात अनेक ड्रग डिलर्ससोबत अमली पदार्थाच्या पार्टीची ही छायाचित्रे आहेत. अमली पदार्थ विभागाने आपल्या भावाला खोट्या प्रकरणात गुंतवल्याचा दावा करणार्या आयाला व दुदूच्या प्रेयसीचे पितळ उघडे पडले आहे. नुकतेच गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी घेतलेल्या जबानीत आम्ही केवळ उपनिरीक्षक सुनील गुडलर याचे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठीच खास गोव्यात आलो होतो, असेही त्यांनी आपल्या जबानीत म्हटले होते.
हाती लागलेल्या या छायाचित्रांमुळे आयाला आणि दुदू याची प्रेयसी २००९ साली हणजूण येथे झालेल्या अमली पदार्थाच्या पार्टीत उपस्थित असल्याचे हे पुरावे उघड झाले आहेत. यात अनेक ड्रग डिलरही सहभागी झाल्याचे दिसत आहे. या पार्टीत बिनधास्तपणे गांजा आणि चरसचे सेवन केले जात असून समोरच्या टेबलवर ‘चिलीम’ आणि मद्याच्या बाटल्या स्पष्टपणे दिसत आहेत.
छायाचित्रात सोफ्यावर बसलेले‘ऍलन’ आणि ‘बाकूशा’ हे ड्रग डिलरही या पार्टीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऍलन हा दुदू याचा साथीदार असून बाकूशा याला मनाली पोलिसांनी अमली पदार्थाच्या एका मोठ्या साठ्यासह अटक केली आहे. अलीरन हाही मोठा ड्रग डिलर या पार्टीत उपस्थित होता. एका ड्रग प्रकरणात इस्रायली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर १९९९ ते २००२ पर्यत त्याला तीन वर्षांची शिक्षाही झाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी गोव्यात प्रवेश केला असून सध्या तो हणजूण येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. तो सध्या किनारी भागात अमली पदार्थाच्या विक्रीचा जोरदार व्यवसाय करत असल्याचीही माहिती मिळाली आहे.
‘दुदू’ याला या ड्रग प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी सध्या आयाला आणि झरिना यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी एका पोलिस कार्यक्रमात गोव्यात एकही ड्रग माफिया नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामागील उद्देशही आता जनतेच्या लक्षात यायला लागला आहे.
Saturday, 15 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment