सारा देश गहिवरला; हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
पुणे, दि.२४ (प्रतिनिधी): भारतीय गायकीला ‘भीमसेनी’ थाट देणारे स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे आज सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ‘काया ही पंढरी.. आत्मा हा विठ्ठल...’ हा त्यांनीच गायलेला अभंग वैकुंठ स्मशानभूमीत दुमदुमला आणि दुपारी अडीचच्या सुमारास हजारो शोकाकूल चाहत्यांच्या साक्षीने पंडितजींना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे भरून आलेे. पंडितजींच्या अनंत आठवणींचा पट डोळ्यांसमोरून तरळल्याने कंठ दाटून अनेकांना हुंदका आवरला नाही.
वीस दिवसांपूर्वी पंडितजींना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथेच त्यांचा त्रास वाढल्याने कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले होते.
गेले बारा दिवस त्यांच्या प्रकृतीत सतत चढउतार होत होता. काल रविवारीच त्यांचा त्रास वाढला. त्यातूनच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी सकाळीच सर्व वाहिन्या व वृत्तसंस्था मुळे सर्वत्र प्रसृत झाल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच त्यांच्या राहत्या घरी म्हणजे सेनादत्त पेठेतील बंगल्यावर शोकाकूल चाहत्यंाची गर्दी सुरु झाली.
हजारोंच्या उपस्थितीत सायंकाळी सव्वाचारच्या दरम्यान येथील वैकुंठस्मशानभूमीवर स्वरभास्कर, भारतरत्न भीमसेन जोशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस एम कृष्णा उपस्थित होते. कृष्णा यांनी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. भीमसेन जोशी यांची अंत्ययात्रा निघण्यापूवीं काही मिनिटे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आपले विमान पुण्याला वळवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तीन वाजता अंत्ययात्रा सुरु झाली. घरापासून वैकुंठ स्मशान जवळच असल्याने दहा मिनिटातच ती वैकुंठवर पोहोचली. तेथे प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कृष्णा यांना येण्यास वेळ लागल्याने स्मशानभूमीवरच काही वेळ सर्वांना थांबावे लागले. त्यांच्या श्रद्धांजलीनंतर शासकीय मानवंदना, एकवीस बंदुकांची तीन वेेळची सलामी, पोलिस बँडचे
शोकधून वादन आणि श्रद्धांजली शस्त्र असे करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर मंत्राग्नी संस्कार करण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी त्यांनीच गायिलेले ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ’ हे भक्तीगीत ध्वनिक्षेपकावर वाजवण्यात येत होते. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
अल्प परिचय
पंडितजींनी भारतातील सामान्य माणसाला शास्त्रीय संगीत आणि भक्तीसंगीत गुणगुणायला भाग पाडले. गाण्याच्या पहिल्या स्वरापासून आक्रमक गायकीने सामान्य माणसाच्या मनाची पकड घेणारे भारतरत्न भीमसेन जोशी हे विसाव्या शतकातील आणि एकविसाव्या शतकातीलही लोकप्रिय गायक. किराणा घराण्याच्या बाजातून शास्त्रीय गायकी आणि भक्तिसंगीत ही त्यांची भारतीय संगीताला अजरामर देणगी मानली जाते. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना २००८ मध्ये देण्यात आला. मराठीत त्यांची लोकप्रियता ‘संतवाणी’ या अभंग गायकीने परिचित आहे. कानडीतही त्यांची संतवाणी लोकप्रिय झाली.
त्यांच्याकडे गायकीची परंपरा आली ती त्यांच्या आजोबांकडून. त्यांचे आजोबा भीमाचार्य हे त्या काळातील नाणावलेले गायक होते. भीमसेन यांना लहानपणापासूनच गायनाचे विलक्षण आकर्षण होते. गाणे शिकण्यासाठी घरातून पळून गेले व मुंबई, विजापूर, जालंदर, कलकत्ता, आदी ठिकाणी चांगल्या गुुरुच्या शोधात भ्रमंती करून गायनकला आत्मसात केली. काही काळ त्यंानी लखनौ आकाशवाणी केद्रावर नोकरीही केली. अखेरीस रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व यांच्याकडे गाण्याची दीक्षा घेतली. त्यांनी निरलसपणे गुुरुसेवा करून अतिशय परिश्रमाने पाच वर्षे शिक्षण घेतले. सवाई गंधर्व यांच्या षष्ठब्दीच्या कार्यक्रमात ते प्रथम पुण्याला आले. सवाई गंधर्व यांनी त्यांची किराणा घराण्याची गायनाची परंपरा त्या घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खॉं यांच्याकडून गुरुशिष्य परंपरेत घेतली. त्याचबरोबर सवाई गंधर्व यांनी देवगंधर्व भास्करबुवा बखले व ग्वाल्हेरचे निसार हुसेन खान यांच्याकडे शिक्षण घेऊन किराणा घराण्याची गायकी विकसित केली होती. ती सारी गायकीची परंपरा सवाईगंधर्व यांनी भीमसेन यांना दिली. १९३३ साली म्हणजे अगदी लहानपणी त्यांनी अब्दुल करीम खॉंन यांची ‘पिया बिन नही आवत चैन ’ ही झिंझोटी रागातील ठुमरी त्यांनी ऐकली आणि मनानेच करीम खॉं यांच्याकडे जाऊन शिष्यत्व पत्करायचे ठरविले. त्यावेळी त्यांचे वय ङ्गक्त अकरा वर्षाचे होतेे. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडून त्यांनी खॉन साहेबांची गायकी शिकली. १९४३ मध्ये त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर पहिले प्रत्यक्ष म्हणजे लाईव्ह गायन केले. ते अवघे बावीस वर्षाचे असताना हिज मास्टर्स व्हाईस या ग्रामोङ्गोन कंपनीने त्यांच्या कानडी आणि हिंदी गायनाचा पहिला अल्बम काढला.
जयपूर घराण्याच्या केसरबाई केरकर आणि इंदूर घराण्याचे अमीरखान यांच्याकडून लयकारीच्या बोल ङ्गिरवण्याच्या व तानङ्गिरकीच्या जाती आत्मसात केल्या. यांचा परिणाम असा झाला की सवाई गंधर्व यांची मूळची स्वरप्रधान गायकी भीमसेन यांनी अधिक आक्रमक, अधिक गतीमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी अशी केली. त्यांच्या या वैशिष्ठयामुळे त्यांचेे स्थान संगीत विश्वात अजरामर मानले जाते. रामकृष्ण पटवर्धन, माधव गुडी, पंडीत विनायक तोर्वी, श्रीकांत देशपांडे, उपेंद्र भट, आनंद भाटे, आणि त्याचा मुलगा श्रीनिवास यांचा समावेश त्यांच्या शिष्यवर्गात आहे.
भीमसेन जोशी यांचे वैशिष्ट्य असे की, सामान्य माणूस आणि शास्त्रीय गायनाची आवड असणारे अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांचे गायन आवडत असे. भीमसेनजी हे चतुरस्र गायक असले तरी त्यांचे आवडते राग म्हणजे शुद्धकल्याण, मिया की तोडी, पूरिया धनश्री, मुलतानी, भीमपलास, दरबारी आणि रामकली. भीमसेनजींनी ङ्गारसे चित्रपटांचे पार्श्वगायन केलेले नाही, पण जे केले ते मात्र अजरामर झाले. पुण्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव ही देशातील संगीत वैभवाची शान मानली जाते. तो महोत्सव भीमसेनजींनी १९५३ मध्ये सुरू केला.
नामवंतांची आदरांजली
राष्ट्रपती प्रतिभा पाटील ः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पंडितजींनी सामान्य माणसापर्यंत पोहोचवले त्यातून त्या संगीताला लोकप्रियतेची उंची मिळाली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ः भीमसेनजींच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचे ङ्गार मोठे नुकसान झाले आहे. ते गाताना असे वाटत असे की, त्यांच्या सुरात सारा भारत बोलत आहे. किराणा घराण्याच्या शैलीतून त्यांनी भारतीय संगीत शिखरावर नेलेे.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ः भीमसेनजींच्या निधनाने देशाची अपरिमीत हानी झाली आहे. त्यांची गायकी म्हणजे ईश्वरी आविष्कारच होय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ः पंडितजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले होते तरी जनसामान्याच्या हृदयात त्यांना जे स्थान मिळाले होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा ः भीमसेनजी कर्नाटकचे व महाराष्ट्राबरोबरच सार्या देशाचेही होते. त्यांच्या निधनाबद्दल कर्नाटक सरकार एक दिवसाचा राज्य पातळीवरील शोक पाळत आहे.
भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याचे कळल्यावर बेंगळुरू येथून दिल्लीला जाणारे विमान घेऊन येडियुराप्पा पुण्याच्या दिशेने आले व त्यांनी भीमसेनजींना येथील सेनादत्त पेठेतील त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
सुप्रसिद्ध धृपद धमाल गायक सईदुद्दीन डागर ः ते या शतकाचे तानसेन होते. आम्हा डागरमंडळींवर त्यांनी मनापासून प्रेम केले होते.
सुरेश तळवळकर ः ते ङ्गक्त परमेश्वरासाठी आणि त्या दृष्टीने स्वतःसाठी गात असत. त्यातून आम्ही धन्य होत होतो.
पडितजींचे चिरंजीव राघवेंद्र जोशी ः आम्ही त्यांना सप्तसुरांचे योगी मानतो.
संजीव अभ्यंकर ः मी संगीताच्या क्षेत्रात स्थिरावलो याला ते कारण घडले. मी बारा वर्षांचा असताना माझे गाणे ऐकले व त्यांनी माझ्या आई वडिलांना असे सांगितले की, या मुलाची गायकी ज्ञानेश्वर कुळातील आहे.
अमजद अली खान ः ते किराणा घराण्याचे गायक होते हे सर्वांना माहीत आहे पण आज असे निश्चित म्हणता येईल की ते स्वतःच एक घराणे होते.
चित्रकार रवी परांजपे ः गेल्या पन्नास वर्षांत भारतीय संगीताला कमी लेखण्याची जगात एक पद्धती पडली होती. तो प्रकार पंडितजींच्या गायकीने मागे पडला.
आनंद मोडक ः ते पुढील काही युगांचे मार्गदर्शक ठरले आहेत.
नर्तिका मनिषा साठे ः भारतीय कलाकारांना हा धक्का पचवणे कठीणच.
Tuesday, 25 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment