Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 26 January 2011

श्रीनगरमध्ये आज तिरंगा फडकणारच

भाजपचा निर्धार
सीमेवर एकता यात्रा रोखली

नवी दिल्ली, दि. २५ : उद्या श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा ङ्गडकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्रीनगरकडे निघालेल्या भाजप-भाजयुमोच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना अडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कंबर कसली असून, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी भाजप कार्यकर्ते वैष्णोदेवीला जाणार्‍या भाविकांचा वेश घेऊन काश्मीरमध्ये घुसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसी बळ वापरून झेंडावंदन रोखण्याचा प्रयत्न करणारे केंद्रातील संपुआ सरकार हे इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत आहे, जणू या देशात तिरंगा फडकाविणे हा गुन्हा ठरत आहे. आणीबाणीची आठवण करून देणारी सरकारची कारवाई निषेधार्ह आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ भाजप नेत्यांनी आज व्यक्त केली. तिरंगा फडकाविण्यासाठी आज श्रीनगरमध्ये जाणार्‍या सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांच्यासह असंख्य नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. फुटीरवाद्यांनी दिलेल्या धमकीपुढे सरकार नमल्याचेच सिद्ध होते, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांनी व्यक्त केली आहे. तिरंगा जाळणार्‍यांना सुरक्षा दिली जात आहे, तर जे तिरंगा फडकाविण्यासाठी जात आहेत, त्यांना मात्र अटक केली जात आहे, अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली. एकता यात्रा थांबविण्याची सरकारची कारवाई ही ‘ऐतिहासिक चूक’ठरेल असा इशारा अरुण जेटली यांनी दिला.
पंजाबमधून येणारा राष्ट्रीय महामार्ग आय-ए हा काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी असलेला एकमेव रस्ता मार्ग आहे, तर लखनपूर हे छोटेसे गाव काश्मीरचे एकप्रकारे प्रवेशद्वार आहे. पुलावरून, नदीच्या पात्रातून, तसेच एका कच्च्या रस्त्यावरून त्या गावात प्रवेश करता येतो.
४०० कार्यकर्त्यांना आज जम्मूत अटक करण्यात आली. राज्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने भाजपाच्या रॅलींवर सरकटपणे बंदी टाकली आहे. या कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. काही ठिकाणी पोलिस व प्रदर्शनकारी यांच्यात संघर्ष उडाला असता दगडङ्गेक झाली. कालच जम्मू-काश्मीर सरकारने राज्यभरातून भाजपाच्या दीड हजारावर कार्यकर्त्यांना अटक केली.
नेत्यांना ताब्यात घेतले
उद्याच्या लाल चौकातील तिरंगा ङ्गडकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजपाच्या चार वरिष्ठ नेत्यांचे येथील विमानतळावर आगमन होताच त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात आाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या चार नेत्यांची नावे अशी आहेत : जुगल किशोर, घारू राम व श्याम चौधरी तसेच उधमपूरचे भाजपा नेते पवन खजुरिया. कालच भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार यांना जम्मू विमानतळावर उतरताच ताब्यात घेऊन त्यांना रस्त्याच्या मार्गाने पंजाब राज्यात सोडण्यात आले होते.
भारतीय जनता पक्षाच्या एकता यात्रेला रोखण्यासाठी, जम्मू-काश्मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणारे लखनपूर गाव व परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून, काश्मीरकडे जाणार्‍या सर्व मार्गांवर पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. कोणतीही किंमत मोजून एकता यात्रेला रोखण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. काश्मिर व पंजाबला जोडणारा रावी नदीवरील पूल व नदीच्या पात्रावरही पोलिस चोवीस तास लक्ष ठेवत असून, जम्मू-काश्मीरच्या सशस्त्र पोलिस दलाचे दोन हजार जवान लाठ्या व अश्रुधुराची नळकांडी घेऊन परिसरात तैनात करण्यात आले आहेत. त्या ठिकाणावरून काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार्‍यांना रोखण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे, १०० मीटर लांबीच्या पुलाच्या मध्यावर पहारा देत असलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. या पुलाचा अर्धा भाग काश्मीरमध्ये, तर अर्धा भाग पंजाबच्या हद्दीत असल्याने पुलाच्या अर्ध्या भागात काश्मीरचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर-पंजाब सीमेवर दोन हजार पोलिस तैनात करण्यात आले असून, त्यांच्या मदतीसाठी आणखी पोलिस सज्ज ठेवण्यात आले आहेत. हे पोलिस भ्रमणध्वनी व वायरलेस संचाद्वारे त्यांच्या वरिष्ठांच्या संपर्कात राहून वेळोवेळी त्यांना परिस्थितीची ताजी माहिती पुरवित आहेत.

No comments: