ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैकुळ सत्तरीत वनखात्याची कारवाई
वाळपई, दि. २८ (प्रतिनिधी): पैकुळ सत्तरी येथे बेकायदा खनिज उत्खननासाठी एका खनिज कंपनीने पाठवलेले पी. सी. एल. अँड टी. २०० कुमात्सू हे पोकलिन गुळेली पंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी काल रात्री ९ वाजता अडवून वनखात्याच्या ताब्यात दिले. महत्त्वाचे म्हणजे ते कोणत्याही परवानगीशिवाय धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील बोंडला अभयारण्याच्या हद्दीतून या भागात पोचले होते.
लोकांनी पोकलिन अडवून ठेवल्यानंतर वनखात्याला कळविले. त्यानंतर वनखात्याच्या फिरत्या पथकाने ते ताब्यात घेऊन बोंडला येथे नेले व त्यास ‘सील’ ठोकले. मशीनचा चालक अनिल नाईक व साहाय्यक सचिंद्र नाईक (दोघेही रा. अंकोला कारवार) यांना ताब्यात घेतले.
वनखात्याचे लॉरेन्स डायस, उप विभागीय वनाधिकारी धराजीत नाईक यांनी ही कारवाई केली. याकामी डॉ. दत्ताराम देसाई, रणजीत राणे, ऍड. शिवाजी देसाई, विशांत कासार, राघू गावकर, गॅब्रियल डिकॉस्टा, मिलिंद देसाई, नारायण देसाई, शैलेश देसाई आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
याप्रसंगी उपवनपाल सुभाष हेन्री यांनी वनकायद्याच्या कलम २० नुसार कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. डॉ. देसाई यांनी सत्तरीत बेकायदा खाणींचे कसे पेव फुटले आहे त्याचा हा पुरावाच असल्याची प्रतिक्रिया दिली.
हे मशीन राजकीय वरदहस्ताशिवाय पैकुळमध्ये आणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. त्याचप्रमाणे या मशीन चालकाकडे कसलाच परवाना नव्हता, असेही त्यांनी सांगितले. ऍड. देसाई यांनी हे प्रकरण विधानसभा अधिवेशनात मांडले जायलाच हवे, असेही निक्षून सांगितले.
वनखात्यावर दबाव
दरम्यान, हे मशीन बोंडला अभयारण्याच्या गेटमधून येणार असल्याची माहिती लोकांना काल रात्रीच मिळाली होती. त्यांनी ही बाब वनखात्याला कळविली होती. तथापि, वनखात्यावर राजकीय दबाव असल्याची असल्याचे एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या बोलीवर सांगितले. ही गोष्ट जेव्हा लोकांना समजली तेव्हा डॉ. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १०७७ या क्रमांकावर तक्रार केली. त्यावेळी वनखात्याचे अधिकारी पोकलिन अडवल्याच्या ठिकाणी पोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत खात्याचे कर्मचारी शांबा सावंत, लक्ष्मण नाईक, काशीनाथ कोनाडकर, जयराम गावकर, दिपक महाले, कल्पेश नाईक उपस्थित होते.
वन अधिकारी अचंबित
ज्यावेळी पंचनामा करण्यात येत होता, त्यावेळी साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी १० -१२ नागरिकांनी तयारी दाखविली तेव्हा वन अधिकारी अचंबित झाले. पैकुळहून मशील नेले जात असताना ३० - ३५ नागरिक बोंडला अभयारण्यपर्यंत आले होते. अटक केलेल्या वाहनचालकाने मशीनाच्या मालकाचे नाव सतीश सैल व कंत्राटदाराचे नाव संजय चौगुले असल्याचे सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी सत्तरी युवा मोर्चाने केली आहे. ते मशीन कोणत्याही स्थितीत मालकाच्या ताब्यात देऊ नये, तसेच या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्यास त्याचा गंभीर परिणाम होईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
Saturday, 29 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment