मडगाव, दि.२३ (प्रतिनिधी)
विकासाबाबत सरकारला राजकीय अभिनिवेेश बाळगता येणार नाही, गोव्याची प्रगती याच मुद्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल व त्याच अटीवर आपण ‘गोवा व्हीजन २०३५’ दस्तावेज समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानुसारच आपण या समितीच्या शिफारशींचा दस्तावेज सरकारला सादर करणार आहोत, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आज येथे केले.
गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त उच्च शिक्षण विभागाने कला व संस्कृती खात्याच्या व सुवर्णमहोत्सव समितीच्या सहकार्याने आयोजित युवा मेळावा कार्यक्रमात गोव्यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मते जाणून घेतल्यावर ते बोलत होते. थोर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर तसेच गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबाागकर हेही रवींद्र भवनात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित होते.
२०३५ पर्यंंतचा गोवा कसा असावा याबाबतचा दस्तावेज सादर करण्याचे काम सरकारने या समितीकडे सोपवले आहे. आगामी पंचवीस वर्षांतील गोवा कसा असावा याबाबत युवकांच्या मनोभावना जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते.
विद्यार्थ्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त केलेल्या मतांबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, खाण व पर्यटन व्यवसाय हा आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक आहे. तो माडीत काढता येणार नाही. मात्र त्यावर निर्बंध घालता येतील. सरकारने ते करायला हवे. गोवा हे शिक्षणाचे केंद्र होते, आहे व यापुढेही असेल.
संपत्तीसाठी शिक्षण अशी सांगड घालू नका असा सल्ला त्यांनी दिला व त्या संदर्भात सीडीचे उदाहरण दिले. सरकार वा अन्य कोणावर बेजबाबदारपणाचा आरोप न करता आपण स्वतः जबाबदार नागरिक बनावे. त्यासंदर्भात इंडोनेशिया व चीनमधील नागरिकांनी स्वतः वर घालून घेतलेले निर्बंध लक्षात घ्या. प्रत्येकात संवेदनशीलता असण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करताना आपल्या जीवनातील हा सर्वांत संस्मरणीय कार्यक्रम ठरेल असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी, युवकांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमती व्यक्त केली. ते म्हणाले, विकास हवाच पण तो साधताना निसर्गाची किमान हानी होईल हे पाहणे महत्त्वाचे. दस्तावेज तयार करताना युवकांकडून आलेल्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. युवकांनी केलेल्या सूचना सरकारला डावलता येणार नाहीत. युवकांना फेसबुकसारख्या माध्यमांतून आपले हे विचार इतरांपर्यंत पोहोचवून जनमत तयार करता येईल, असेही ते म्हणाले.
डॉ. दिलीप देवबागकर यांनी शिक्षणव्यवस्थेत पारदर्शकता असण्याच्या गरजेवर भर दिला त्यादृष्टीने सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली. संजय तळवडकर, डॉ. बबीता आंगले व अनंत अग्नी यांनी सूत्रसंचालन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment