पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): संपूर्ण देशाबरोबरच गोव्यातही जनगणनेच्या कामास प्रारंभ झाला आहे. यासाठी विविध सरकारी कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण शिबिरेही सुरू करण्यात आली असून सरकारी शिक्षकांसह विविध खात्यातील सरकारी कर्मचार्यांना या कामात जुंपण्यात आल्याने शिक्षणाचा घोळ तर होणार आहेच, परंतु त्याचबरोबर संपूर्ण प्रशासकीय कारभारच ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जनगणना कामाच्या दुसर्या टप्प्याला प्रारंभ झाला असून तो ६ फेब्रुवारी ते ५ मार्च असा सुरू राहणार आहे. ६ ते ८ फेब्रुवारीपर्यंत प्रगणकांना आपापल्या प्रभागांचे नकाशे तयार करावे लागतील. ९ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम होणार असून १ ते ५ मार्चपर्यंत चुकलेल्या नावांच्या फेरसर्वेक्षणाचे काम आखून देण्यात आले आहे. त्यात भरीस भर म्हणून २८ फेब्रुवारीच्या रात्री बेघर तथा भटक्या लोकांची माहिती गोळा करण्याचे कामही या कर्मचार्यांना करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी विविध सरकारी खात्यांतील कर्मचारी तथा सरकारी शिक्षकांची नेमणूक केल्याने त्याचा विपरीत परिणाम प्रशासकीय कामकाजावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी एकशिक्षकी व द्विशिक्षकी शाळा आहेत. अशा शाळांतील शिक्षकांना या कामासाठी नेमण्यात आल्याने त्या शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवणार आहे. वीज खात्यातील बहुतांश कर्मचार्यांना या मोहिमेवर राबवण्यात येणार असल्याने या खात्याचा कारभारही ठप्प होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मोहिमेसाठी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही व त्यामुळे सगळ्याच प्रशासकीय कामकाजाचा खेळखंडोबा होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संपूर्ण मोहिमेसाठी हजारोंच्या संख्येने सरकारी व निमसरकारी कर्मचारी काम करणार आहेत. या संबंधीचे आदेश भागशिक्षणाधिकारी कार्यालये, मामलेदार व जिल्हाधिकार्यांमार्फत सर्वांना पोहोचवण्यात आले आहेत.
दरम्यान, या कामामुळे नेमून दिलेला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास शिक्षकांना बरीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या नियोजनशून्य कारभारावर शिक्षक समूहाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विविध शैक्षणिक संस्थांत शिक्षणोत्तर उपक्रम राबवण्याचा हा मोसम असल्याने जनगणना मोहिमेमुळे हे कार्यक्रम कसे काय उरकावे असाही यक्षप्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे.
Sunday, 23 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment