Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 26 January 2011

सिप्रियानो फर्नांडिस मृत्यूप्रकरण तिघे पोलिस निलंबित

तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): मयडे बार्देश येथील सिप्रियानो फर्नांडिस मृत्यू प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक राधेश रामनाथकर व हवालदार संदीप शिरवईकर या तिघांना आज सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलिस चौकशीत या तिघांनी हलगर्जीपणा केल्याचे सिद्ध झाल्याने आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही माहिती पोलिस अधीक्षक तथा प्रवक्ते आत्माराम देशपांडे यांनी दिली.
पोलिस उपअधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, सिप्रियानो याला अटक केल्यानंतर पणजी पोलिसांनी पोलिसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सिल्वा यांच्या अहवालाच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. मात्र, सिप्रियानोच्या मृत्यू प्रकरणाशी या अधिकार्‍यांचा संबंध असल्याचे अद्याप उघड झालेले नाही. त्याबाबतची चौकशी उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये करीत आहेत. निरीक्षक संदेश चोडणकर पोलिस स्थानकात उपस्थित असताना पोलिसी प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्याचा ठपका संबंधित अधिकार्‍यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच, येत्या एका महिन्यात उपअधीक्षक सिल्वा या प्रकरणात अंतिम अहवाल सादर करणार आहेत.
मयत सिप्रियानो यांनी आपल्या प्रेयसीला धमकी दिल्याप्रकरणी त्याला पणजी पोलिसांनी अटक केली होती. मग अमानुष मारहाणीनंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पोलिसांनी दाखल केले होते. यावेळी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले होते. त्याच्या निधनानंतर त्याच्या प्रेयसीने पत्रकार परिषद घेऊन पणजी पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच कारवाई होत नाही तोवर सिप्रियानोचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा त्याच्या नातेवाइकांनी दिला होता.
सिप्रियानोचा मृत्यू पोलिस कोठडीत झाला की नाही, याची चौकशी न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्ये करीत असून येत्या काही दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्त केला जाणार आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) सायंकाळी पणजी पोलिस स्थानकातील ‘केस डायरी’ आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
संदेश चोडणकरांचा न्यायालयात अर्ज
उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्येे यांच्या चौकशीला आव्हान देणारा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी हा अर्ज केला आहे. शेट्ये यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार नसल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला आहे. तसेच, सिप्रियानो याला त्याच्या नातेवाइकांकडूनच मारहाण झाली होती, असा जबाबही एका व्यक्तीकडून न्यायालयासमोर नोंद करून घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

No comments: