भाजप महिला मोर्चाचा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भव्य मोर्चा
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): वाढत्या महागाईच्या निषेधार्थ गगनभेदी घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चातर्फे आज मुख्यमंत्र्यांच्या येथील बंगल्यावर भव्य मोर्चा नेण्यात आला आणि आल्तिनो परिसर त्यामुळे दणाणून गेला. ‘आम आदमीचे सरकार’ असा नारा देणारे कॉंग्रेसचे सरकार फक्त धनाढ्यांचे आहे. गेल्या पाच वर्षांत विविध वस्तूंबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाट वाढले आहेत. याला कारण केंद्रातील व राज्यातील कॉंग्रेसची सरकारेच आहेत, अशी खरमरीत टीका प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी आज येथे केली.
भाजप माहिला मोर्चातर्फे कॉंग्रेसने वाढवलेल्या महागाईविरुद्ध आंदोलनाला सुरुवात झाली असून आता हे आंदोलन गावागावांत नेण्यात येणार आहे. सामान्यांना वार्यावर सोडलेल्या या सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत अशी मागणीही सौ चोडणकर यांनी केली. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर भव्य मोर्चा नेऊन त्यांना महागाईवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन दिल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
महिला मोर्चाच्या दक्षिण गोवा अध्यक्ष कृष्णी वाळके यांनी, कॉंग्रेसच्या लोकविरोधी धोरणावर कडाडून टीका केली. कॉंग्रेसने दलाल पोसल्यामुळे महागाई वाढली असून शेतकरी व ग्राहक यांचे संघटन झाल्यास महागाई कमी होईल असे त्या म्हणाल्या.
सरचिटणीस वैदेही नाईक यांनी या वेळी विद्यमान राज्य व केंद्र सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत असलेल्याचे निवेदन केले. प्रदेश सचिव शिल्पा नाईक निना नाईक आदींनी, कॉंग्रेसविरुद्ध सार्वत्रिक लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
सौ. चोडणकर, नगरसेविका वैदेही नाईक, कृष्णी वाळके, प्रदेश भाजपा सचिव व जिल्हा पंचायत सभासद
शिल्पा नाईक, प्रदेश सचिव नीना नाईक, उत्तर गोवा उपाध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेविका दीक्षा माईणकर, ज्योती मसुरकर, सोनिया आस्नोडकर, प्रतिमा शेट्ये आदी महिला नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर गोव्यातील विविध भागांतून आलेल्या महिला जमल्या व महागाई विरोधात जोरदार घोषणा देत वातावरण तापवले.
महागाई वाढवणार्या कॉंग्रेसचा जोरदार शब्दात धिक्कार करत येणार्या या महिलांना पोलिसांनी अडवताच अध्यक्ष सौ. चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील पंधरा जनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचा भेट घेतली व महागाई विरोधी निवेदन दिले. महागाई कमी करा, जीवनावश्यक वस्तूंचे दर तरी स्थिर ठेवावेत, अशी मागणी करून गेल्या पाच वर्षात वाढलेल्या महागाईचे पत्रकच मुख्यमंत्र्यांना यावेळी सुपूर्त करण्यात आले. निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा कॉंग्रेसविरोधी जोरदार घोषणा देत चर्च चौकातून भाजप कार्यालयापर्यंत आला व तेथे मोर्चाचा समारोप झाला.
Tuesday, 25 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment