खाणीसाठी जागा निश्चित केल्याचा संशय
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्याच्या प्रादेशिक आराखड्यात खाणीसाठी जागा निश्चित केल्याचा संशय असल्याने तो आराखडा जनतेसाठी खुला करावा आणि त्यानंतरच तो अधिसूचित करावा, अशी मागणी ‘गोवा बचाव अभियान’ने केली आहे. त्याचप्रमाणे, अधिसूचित करण्यात आलेला सत्तरीच्या आराखड्याला त्वरित स्थगिती दिली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी आज येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
सत्तरी, पेडणे आणि काणकोणसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या आराखड्यात सरकारच्या राज्यस्तरीय समितीच्या दुरुस्ती केल्यानंतर तो आराखडा पुन्हा लोकांसाठी उपलब्ध करण्यात आला नाही. त्यामुळे सरकारने त्यात काय बदल केले आहेत, याची कोणालाच माहिती नाही. तसेच, अधिसूचित करण्यात आलेल्या आराखड्यात पुन्हा बदल करण्यात येणार नसल्याची अट सरकारची असल्याने सरकारने हा आराखडा पुन्हा लोकांसाठी खुला करावा, अन्यथा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सत्तरीच्या आराखड्यात खाणीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. या तालुक्याचा आराखडा लोकांच्या सूचनांसाठी ३० दिवसांसाठी खुला करावा असे सांगत राज्यस्तरीय समितीही बेकायदा असल्याचा आरोप यावेळी श्रीमती मार्टिन्स यांनी केला.
सरकारच्याच आदेशानुसार प्रस्तावित आराखडा पंचायत आणि पालिकेत तालुकास्तरीय समितीसमोर सूचनांसाठी खुला ठेवणे बंधनकारक आहे. याठिकाणी लोकांच्या सूचना घेऊन मगच तो आराखडा राज्यस्तरीय समिती समोर पाठवण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र, सत्तरीच्या आराखड्यात राज्यस्तरीय समितीनेच बदल करून तो आराखडा नगर नियोजन खात्याकडे पाठवला व तेथून त्याला मान्यता मिळवून घेतली, असा आरोपही त्यांनी केला.
Friday, 28 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment