भाजपची राष्ट्रपतींकडे तक्रार
- भारद्वाजांची वागणूक उद्धट व घटनाबाह्य
नवी दिल्ली,दि.. २४ : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली आणि कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांच्या अतिशय उद्धट आणि घटनाबाह्य वागणुकीची तक्रार नोंदविली. यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिले. त्यात ‘राज्यपालांना तात्काळ माघारी बोलावण्यात यावे,’ अशी जोरदार मागणीही करण्यात आली आहे.
अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात कर्नाटकातील २३ खासदार आणि अनेक मंत्री व आमदारांचा समावेश होता. ‘‘गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हापासूनच राज्यपाल भारद्वाज यांनी भाजप सरकारवर जणू राजकीय सूडच उगविण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात घटनात्मक व्यवस्था कायम राखण्यासाठी भारद्वाज यांना माघारी बोलावणे अतिशय आवश्यक आहे,’’ अशा तक्रारीचे निवेदन अडवाणी यांनी राष्ट्रपतींना सादर केले.
राष्ट्रपती भवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अडवाणी म्हणााले की, राज्यपालांचे वागणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे त्यांना केंद्राने माघारी बोलावणे आवश्यक झाले आहे. त्यांच्या घटनाबाह्य वागण्याचे आणि सुरुवातीपासून त्यांनी आपल्या सरकारविरुद्ध केवळ राजकीय कार्यक्रम राबविल्याचे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आम्ही निवेदनात दिलेली आहेत.
‘भारद्वाज यांची या घटनादत्त पदावरील नियुक्ती देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच्या दिशेचे पहिले पाऊल आहे, असा आरोप करताना, ‘राज्यपालांची मानसिकता आणि वागणे हे पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीचेच तसेच घटनात्मक अधिकारी म्हणून कमी आणि कॉंगे्रसचा कार्यकर्ता म्हणून जास्त राहिले आहे,’ अशी टीका भाजपाने या निवेदनात केली आहे.
राज्यपालांनी जावेच : येडियुरप्पा
आपल्यावर खटला दाखल करण्याची परवानगी देणारे कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना माघारी बोलावण्यात यावे, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी केली आहे. कर्नाटक सरकार विरोधात त्यांनी जी वक्तव्ये केली आहेत त्यासंदर्भात भाजप अवमान याचिका दाखल करणाल आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
राज्यपालांच्या विरोधात नव्याने आरोप करताना ते म्हणाले, कर्नाटक सरकार व माझ्याविरोधात ज्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्या सर्व राजभवनात तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे राज्यपाल भारद्वाज तसेच राज्यासाठी ही बाब चांगली राहील की, कोणते राज्य आपल्यासाठी चांगले राहील हे त्यांनीच निश्चित करून तिकडे जावे, असे येदीयुरप्पा म्हणाले.
कर्नाटकच्या राज्यपाल पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या दिवसापासून या भाजपाशासित राज्याची प्रतिमा डागाळण्याचाच ते सातत्याने उद्योग करत आले आहेत, असा आरोप येडियुरप्पा यांनी केला. कर्नाटक सरकारच्या विरोधात अपमानजनक प्रतिक्रिया दिल्याबद्दल भारद्वाज यांनी बिनशर्त माङ्गी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. २२ जानेवारी रोजी राज्यात जो बंद पाळण्यात आला त्यात राज्याला जबर आर्थिक ङ्गटका बसला आहे, त्यासाठीही त्यांनी राज्यपाल भारद्वाज यांना दोषी धरले आहे. राज्यपाल भारद्वाज यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्यासंदर्भात तसेच इतर कायदेशीर बाबींच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात लढा देण्याचा विचार करत आहे, याकडे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी लक्ष वेधले.
Tuesday, 25 January 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment